मुंबई - दिग्दर्शिका प्रियांका तन्वर ने गेल्या वर्षी ‘वेल डन बेबी’ हा पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर अभिनित चित्रपट दिला होता. त्यात एका महत्वपूर्ण भूमिकेत सोनाली खरे सुद्धा होती. आता सोनाली खरे चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरली असून तिच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तिने प्रियांका तन्वरवर टाकली आहे. नुकतीच सोनाली खरे हिने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली असून या प्रॅाडक्शन हाऊस अंतर्गत ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे.
प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात आई आणि मुलीच्या सुंदर, हळव्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे. मायलेकीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि एक वेगळीच कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये आई आणि मुलीच्या नात्याचे आंबटगोड स्वरूप दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटाबदल निर्माती सोनाली खरे म्हणाली की, "मी निर्मित केलेला हा पहिला चित्रपट आहे. आईचे एक वेगळे महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे. माझा पहिला चित्रपट ‘मायलेक' माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्याची घोषणा करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. लवकरच ‘मायलेक’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून हळूहळू अनेक गोष्टी समोर येतील."
सोनाली खरे निर्मित आणि अभिनित ‘मायलेक’ या चित्रपटाचे लेखन एमेरा यांनी केले असून छायाचित्रण मृदुल सेन यांनी केले आहे तसेच याच्या दिग्दर्शनाची धुरा प्रियांका तन्वर वाहत आहे.
हेही वाचा - Amata Subhash Birthday : चतुरस्त्र अभिनेत्री अमृता सुभाषचे सुंदर फोटो