मुंबई : नुकतीच एक बातमी लक्ष वेधून घेत आहे. आपला देश जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. लोकसंख्येत आपण चीनलाही मागे टाकले असून जगातील २० % लोकसंख्या भारतात आहे. याचाच अर्थ की भारतीय आणि भारत सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी काहीच करीत नाही. ते राजकीय दृष्ट्या फायद्याचे नसल्याने आणि लोकसंख्या नियंत्रणाचा प्रयत्न फसल्यामुळे, कुठलेही सरकार त्या मार्गावर जात नाही. लोकसंख्या नियंत्रणावर मार्मिक भाष्य करणारा मराठी चित्रपट म्हणजे 'पोस्टर बॉईज'. २०१४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून गेला.श्रेयस तळपदे त्याचा निर्माता होता. या चित्रपटाचा हिंदीत रिमेक केला गेला ज्याचे दिग्दर्शन श्रेयस ने केले होते. आता या मराठी चित्रपटाचा सिक्वेल आला आहे. 'आले रे पोस्टर बॉईज २', ज्याच्या पोस्टरचे अनावरण ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. त्याआधी श्रेयस तळपदेने सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेतला.
पहिल्या पोस्टर बॉईजचे कथानक : पहिल्या पोस्टर बॉईजचे कथानक महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बेतले होते, तर 'आले रे पोश्टर बॉईज २' मधील बॉईज आता थेट लंडन मधून आपली कैफियत मांडताना दिसतील. पहिल्या भागात धमाल कॉमेडी होती. तो चित्रपट सुपरहिट झाला होता. त्या भागातील दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे कलाकार-त्रिकुट सिक्वेल मध्ये ही दिसेल. या दुसऱ्या भागाची टॅगलाईन आहे. 'दिसते तसे नसते म्हणून जग फसते'. तसेच पोस्टरमध्ये 'फुल्ल बॉडी मसाज, कॉल डॉली' असे लिहिलेले दिसत असून हे बॉईज अत्यंत वेगळ्या रूपात आणि ढंगात प्रेक्षकांसमोर येतील याची जाणीव होते. 'आले रे पोश्टर बॉईज २' चे दिग्दर्शन अजय मयेकर करणार आहेत.
विनोदासह सामाजिक प्रबोधन : 'आले रे पोश्टर बॉईज २'चे २५ फूटी भव्य पोस्टर ढोल ताशाच्या गजरात मुंबईत लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या पोस्टर वरून कळते की तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात आहेत. त्यामुळे यावेळी त्यांच्या गोंधळाची जागा असेल लंडन. या चित्रपटाची निर्मिती अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दिप्ती तळपदे यांची असून एएनडब्लू स्टुडिओज आणि विरांगना फिल्म्स यांची प्रस्तुती आहे. अमित भानुशाली सहनिर्माते आहेत. पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांच्या लेखणीतून उतरले असून हितेश मोडक यांनी संगीताची बाजू सांभाळली आहे. 'आले रे पोश्टर बॉईज २' मध्ये बॉईज परदेशात भरारी मारताना दिसतील. या चित्रपटातून निखळ विनोदासह सामाजिक प्रबोधनही होईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : Creative Pamela Chopra Passed Away : आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रासह यश राज फिल्म्स पोरके झाले, सृजनशील पमेला चोप्रांचे निधन