मुंबई - आज इतकी वर्षे होऊनही ‘श्यामची आई'ची आईची लोकप्रियता कमी झालेली नाही. याच कथानकावर आधारित त्याच नावाचा सिनेमा दिग्दर्शक सुजय डहाके बनवत आहे. आजच्या रंगीबेरंगी युगातील हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असल्यानं रसिकांना जुन्या काळात घेऊन जाणार आहे. सुजय या चित्रपटात कोकणातील कलाकारांसोबतच पन्हाळा-कोल्हापूरमधील ६०-७० कलाकारांच्या साथीनं श्याम आणि त्याच्या आईच्या मायाळू नात्याची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोकणातील पावसमध्ये पहिलं शेड्यूल यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शक सुजय डहाके आणि त्याची टीम पन्हाळा मुक्कामी पोहोचली आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग पन्हाळा इथं सुरू आहे.
![श्यामचे आईचे पन्हाळ्यामध्ये शुटिंग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-shyamchi-aai-shoot-second-schedule-at-panhala-mhc10001_13052022010736_1305f_1652384256_729.jpeg)
अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव 'श्यामची आई'ची निर्मिती करत आहेत. माजी खासदार धनंजय महाडीक यांनी क्लॅप दिल्यानंतर 'श्यामची आई'च्या पन्हाळ्यातील शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला. 'श्यामची आई'सारखे चित्रपट बनणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं प्रतिपादन करत धनंजय महाडीक म्हणाले की, “कला, क्रिडा आणि शिक्षणाचा खूप मोठा वारसा कोल्हापूरला लाभला आहे. भालजी पेंढारकरांमुळं कोल्हापूरमध्ये चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचं आपणा सर्वांना माहित आहे. त्यामुळं कोल्हापूरमधील बरीच रत्नं संगीत-कला क्षेत्रात चमकली आहेत. यामुळं कोल्हापूरचं चित्रपटांवर विशेष प्रेम आहे.”
“इथं बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांचं शूटिंग कोल्हापूरसह पन्हाळगडावर झालेलं आहे. पन्हाळगड आणि पावनखिंड ही प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशाच पन्हाळगडावर 'श्यामची आई'च्या दुसऱ्या शूटिंग शेड्यूलचा शुभारंभ होत असल्यानं मी मनापासून या चित्रपटाला अमृता राव, सुजय डहाके आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. शूटिंगसाठी हि वास्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल भोसले सरकार यांचे आभार मानतो. या चित्रपटाचा प्रीमियरही कोल्हापूरात करावा अशी विनंती करतो. या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल”, ते पुढे म्हणाले.
आजवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले चित्रपट बनवणारा सुजय डहाके या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. पन्हाळ्यातील एका शाळेत सध्या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. कोकणामधील बऱ्याच नयनरम्य ठिकाणांवर शूट केल्यानंतर पन्हाळ्यामध्ये चित्रपटातील महत्त्वाच्या भागाचं चित्रीकरण सुरू आहे.
हेही वाचा - Amata Subhash Birthday : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अमृता सुभाषचा वाढदिवस