मुंबई - आमिर खान अभिनित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित दंगल हा कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या फोगाट फॅमिलीवर आधारित बायोपिक होता. यामध्या गीता आणि बबिता फोगाट या बहिणींच्या भूमिकांसाठी अनुक्रमे फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या नवोदित अभिनेत्रींची निवड झाली होती जी त्यांनी सार्थ ठरवली. यातील सान्या मल्होत्रा चोखंदळ राहिली आणि नंतर ती वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून दिसली. सान्या मल्होत्रा नंतर आयुष्मान खुराना सोबत बधाई दो या सुपरहिट चित्रपटातून झळकली. ती नवाझुद्दिन सिद्दीकी सोबत फोटोग्राफ या आर्ट फिल्ममध्ये दिसली. तसेच राधिका मदन सोबत एक अनोखा चित्रपट पटाखा मधून तिने काम केले. तसेच शकुंतला देवी, ल्युडो, मीनाक्षी सुंदरेश्वन सारख्या चित्रपटांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या. आता ती कठल नावाच्या वेब फिल्ममध्ये शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. त्या चित्रपटाच्या निमित्ताने सान्या मल्होत्राने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम बरोबर गप्पा मारल्या.
तुझ्या चित्रपटाचे नाव अगदी अनोखे आहे. कठल बद्दल काय सांगशील? - कठल म्हणजे फणस. कठलचे कथानक फणस या विषयाभोवती फिरते. अर्थातच या चित्रपटाचे शीर्षक अनोखे आणि लक्षवेधी आहे. एका गावात एक राजकीय नेत्याच्या अंगणातून दोन फणस चोरीला जातात आणि ते शोधण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते. तेथील पोलीस स्टेशनची मी प्रमुख असून माझ्या देखरेखीखाली तपास सुरू असतो. महत्त्वाचं म्हणजे ह्याची कथा सत्य घटनेवरून बांधली गेली आहे. आणि फणस चोरीला जाणे आणि त्यांचा तपास पोलिसांमार्फत होणे हे प्रत्यक्षात घडले आहे.
खरंतर निर्माती गुनित मोंगा, जिने द एलिफंट व्हिस्परर्स साठी ऑस्कर पटकावले, हिचा मला फोन आला होता. आम्ही पगलैटमध्ये एकत्र निर्माती-अभिनेत्री म्हणून एकत्र आलो होतो आणि आमचे सुर उत्तम जुळले होते. तिला आणि सर्व युनिटला माझे काम खूप आवडले होते. असो. तर गुनित ने मला सांगितले की तिच्या जवळ एक सुंदर वन लाईन आहे आणि तिला मला ती ऐकावयाची आहे. आम्ही झूम कॉल वर बोललो आणि ती आयडिया ऐकल्यावर मी तर तिच्या प्रेमातच पडले. नंतर मी दिग्दर्शक यशोवर्धन मिश्रा यांना भेटले. त्यांनी मला कथा सांगितली आणि मला समजले की मला या प्रकल्पाचा भाग व्हायचेच आहे. यशो आणि त्याचे वडील अशोक मिश्रा यांनी सुंदर पटकथा लिहिली आहे.
नजीकच्या काळात तुझे अनेक चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झालेत. त्याचा तुझ्या करियरला फायदा झाला की तोटा? - नक्कीच फायदा. खरं म्हणजे मला लॉकडाऊन फळला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोना कालखंडात चित्रपटगृहे बंद असल्याकारणाने अनेक सिनेमे ओटीटी वर प्रदर्शित करण्यात आले. माझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर प्रेक्षकांचा आणि फिल्म इंडस्ट्री मधील लोकांचा माझ्याकडे, एक अभिनेत्री म्हणून, बघण्याचा दृष्टीकोन बदलला. घरबसल्या अनेकांना माझ्यातील अभिनयक्षमतेबद्दल कल्पना आली. त्यामुळे मला चांगले रोल्स ऑफर होताहेत. मीनाक्षी सुंदरेश्वर, लव्ह हॉस्टेल, लुडो हे चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झाले. परंतु पगलैट नंतर बदल प्रकर्षाने जाणवू लागला. मी तो बदल अनुभवला आहे आणि त्याचे श्रेय ओटीटीला नक्कीच जाते. दंगल पासूनच अभिनयावर मी खूप मेहनत घेत आले आहे आणि तेथूनच माझी अभिनेत्री म्हणून कंडिशनिंग सुरू झाली होती. आतापर्यंतचा प्रवास नक्कीच चांगला आहे.
तू पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका करतेयेस, त्याबद्दल काही सांगू शकशील? - 'कठल : एक जॅकफ्रूट मिस्ट्री' ने मला हे शिकण्यास मदत केली की एक महिला पोलिस तिचे काम करण्यासाठी 'मर्दानी' असणे आवश्यक नाही. मेंटली टफ असणे गरजेचे असते. स्त्रियांना हे चांगले जमते. माझ्या भूमिकेचे नाव महिमा असून हे पात्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते. एका बाजूला बसून मी फक्त त्यांचे निरीक्षण करीत होते. त्यांची वागण्याची पद्धत, बोलण्याची ढब आदी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत ही भूमिका साकारली आहे. मला एक मात्र जाणवले की महिला पोलिसांचे जीवन खूप आव्हानात्मक असते. आम्ही बऱ्याच पोलिस स्टेशनस् आणि तुरुंगांना देखील भेट दिली.
तुरुंगातील गुन्हेगारांची काय प्रतिक्रिया होती? - (हसत) ते सर्व माझ्याकडे एकटक पाहत होते. सान्या मल्होत्रा आपल्याला भेटेल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. त्यांच्यापैकी बरेच जण माझ्याकडे नुसते पाहत होते पण सुदैवाने काहीही अप्रिय घडले नाही. मी तेथील जेलर यांच्याशी देखील बातचीत केली आणि कदाचित माझ्या फॅन्समध्ये वृद्धी झाली असेल.
पूर्वी स्त्री कलाकारांना पोलिसांची भूमिका दिली जात नसे. आता चित्र बदलले आहे असे तुला वाटते का? - नक्कीच, हल्ली ते चित्र बदलले आहे. आता बऱ्याच चित्रपट आणि वेब सिरीज मधून महिला पोलीस अधिकाऱ्याचे पात्र मुख्य भूमिका साकारताना दिसते. रविना टंडन, शेफाली शहा, राधिका आपटे, यामी गौतम सारख्या अनेक अभिनेत्री महिला पोलीस अधिकारी साकारताना दिसतात. (हसत) आता त्यात एक नाव जोडले जाईल, सान्या मल्होत्राचे. मला खरोखर आनंद आहे की मी या बदलाचा भाग आहे. एक अभिनेत्री म्हणून मी त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे. मुख्य म्हणजे या इंडस्ट्रीचा मी एक भाग आहे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
तुझे पुढील प्रोजेक्ट्स कोणते आहेत? - मी मिसेस नावाचा चित्रपट करतेय जो लवकरच प्रदर्शित होईल. मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर’मध्ये मी सिलू माणेकशॉ ची भूमिका साकारत आहे जी सॅम माणेकशॉ ची बायको आहे. विकी कौशल सॅम माणेकशॉ ची भूमिका करतोय. आणि अर्थात बहुप्रतिक्षित शाहरुख खान च्या 'जवान' मध्ये माझी महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
हेही वाचा - Cannes 2023 : मृणाल ठाकूरने रेड कार्पेटवर केले सौदर्यांचे प्रदर्शन