मुंबई - Sanjay Raut prediction : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 4 नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय जाहीर करणार आहेत. मात्र, निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व बाबी रेकॉर्डवर आणल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'घटनाबाह्य सरकारचा निकाल झालेला आहे. निर्णय दिल्लीतून आलाय. इथे फक्त शिक्कमोर्तब करतील,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबईत निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "जेव्हापासून क्रिकेट खेळामध्ये जुगार आला तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतोय. त्याच्यावर चर्चा होतेय. दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार काम करतय. सरकारकडून निर्णय घेतल्यानं त्याच्यामुळे देशात महाराष्ट्राची बदनामी होतेय. संविधान पायदळी तुडवलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊनसुद्धा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी देण्यास चालढकल केली. त्यांनी सभागृहात कामांमध्ये आपला राजकीय रंग दाखवला. या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या आहेत."
तुमची मॅच फिक्सिंग झाली -पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "विधानसभा अध्यक्ष हे सध्या न्यायदानाच्या खुर्चीवर बसले आहेत. ते तटस्थ राहिले पाहिजेत. विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असं सांगतो की, एखाद्या कामासाठी, सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे स्वतः जात नाहीत. अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना बोलवून घेतात, असा प्रोटोकॉल आहे. पण, हे मेसेज डेट आणि मॅच फिक्सिंगसाठी ते मुख्यमंत्र्यांच्या केबीनमध्ये जातात. आज घटनाबाह्य सरकारचा निकाल लागणार आहे. निर्णय दिल्लीतून झालेला आहे. इथं फक्त शिक्का मारणं बाकी आहे. मुख्यमंत्री दावोसला जाणार आहेत. कोणत्या खात्रीवर त्यांनी हा निर्णय घेतला? याचा अर्थ तुमची मॅच फिक्सिंग झालेली आहे."
बेकायदेशीर पद्धतीने महाराष्ट्रात राज्य- खासदार राऊत म्हणाले "प्रधानमंत्री रोडशोच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री दावोसला जात आहेत. कारण, त्यांना निर्णय माहित आहे. शिंदे गटाने नेमलेला व्हीप हा बेकादेशीर आहे. राज्यपालांची कृती आणि कारवाई कायदेशीर आहे. त्यामुळे हे सरकार अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने महाराष्ट्रात राज्य करत आहे. नाईलाजाने औपचारिकता म्हणून आज निर्णय दिला जाणार आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान दौऱ्यावर येत आहेत. म्हणजे त्यांना निर्णय आधीच माहित आहे. तसंच मुख्यमंत्री दावोसला जातं आहेत, याचा अर्थ त्यांना आत्मविश्वास आहे. मॅच फिक्सिंगमध्ये सर्व व्यवहार पूर्ण झालेला आहे. त्यांना मॅच फिक्सिंगचा हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे."
हेही वाचा -