मुंबई : करण जोहर दिग्दर्शित चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' २८ जुलै रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. रणवीर सिंग, आलिया भट्ट , धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला 'ग्रँड ट्रीटमेंट' मिळाली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते गाण्यांपर्यंत बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मंगळवार, २५ जुलै रोजी या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली आणि गुरुवार २७ जुलैच्या रात्रीपर्यंत चित्रपटाची एक लाख तिकिटे विकली गेली. दरम्यान आता 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने २८ जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याबद्दल जाणून घेऊ या.
चित्रपटाची कमाई : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.५० कोटी रु. कमाई केली आहे. शुक्रवार,२८ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या शोसाठी प्रेक्षकांची संख्या १२-१३% होती. त्यानंतर रात्रीच्या शोला प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळाली. हा चित्रपट १५ पहिल्या दिवशी 15 कोटीपर्यंत कमाई करू शकतो, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला आता बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची संधी आहे, कारण आता कुठलाही मोठा हिंदी चित्रपट रूपेरी पडद्यावर प्रदर्शित न झाल्याचा पुरेपुर फायदा या चित्रपटाला होऊ शकतो. दरम्यान सध्या हॉलीवूडपट 'ओपेनहाइमर', 'बार्बी' आणि 'मिशन इम्पॉसिबल ७' बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कामगिरी करत आहेत.
चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाला आतापर्यंत प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, ते पाहता चित्रपटाची कमाई नक्कीच वाढेल असे म्हणता येईल. पहिल्या वीकेंडमध्ये हा चित्रपट १८-२० कोटींची कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय प्रेक्षकांना रणवीर आणि आलियाची केमिस्ट्रीही खूप आवडते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच गर्दी करु शकतो. 'गली बॉय' चित्रपटापासूनच रणवीर आणि आलियाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहेत. त्यामुळे हा चित्रपट येणाऱ्या काळात चांगली कमाई करेल, ही शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :