मुंबई - असं म्हटलं जात की महाराष्ट्रात प्रत्येक बारा कोसावर बोलीभाषा बदलते. आपल्या राज्यात मराठीसोबतच अनेक प्रादेशिक भाषा आहे, त्यातीलच एक म्हणजे खानदेशी भाषा. खानदेशी संस्कृती आणि व्यापार उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे एकमेव व्यासपीठ ग्लोबल खानदेश महोत्सव. हा महोत्सव यंदा कल्याण येथे पार पडला. नुकतेच "मराठी पाऊल पडते पुढे" या चिराग पाटील आणि सिद्धी पाटणेच्या आगामी सिनेमाचे आहिराणी भाषेतील गाणे "हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे गाणे लॉंच करण्यात आले. हे गाणे मुख्यत्वे चिराग पाटीलवर चित्रित झाले असून या गाण्याचे गीतकार आणि गायक ‘जळगाव भूषण पुरस्कार’ विजेते प्रवीण माळी यांनी गेले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने म्हणजेच कलाकार चिराग पाटील आणि सिद्धी पाटणे सहित दिग्दर्शक, निर्माते, संगीत दिग्दर्शक साऱ्यांनीच भगवे फेटे परिधान केले होते. भगव्या फेट्या मधील ही मराठी पाऊले जशी जशी प्रेक्षकांसमोर रंगमंचावर पोहचली तेव्हापासून टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला तो कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत!
या प्रसंगी अभिनेता चिराग पाटील म्हणाला, "आमचा आगामी सिनेमा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ मध्ये आम्ही मराठी तरुणांनी उद्योगक्षेत्रात यावे हे सांगत आहोत आणि असा संदेश देण्यासाठी ग्लोबल खानदेश महोत्सव यासारखे उत्तम व्यासपीठ दुसरे असूच शकत नाही. मी पहिल्यांदाच आहिराणी गाणे केले असल्यामुळे एक वेगळाच अनुभव मला मिळाला. गायक प्रवीण माळी यांच्या दमदार आवाजात गायलेले हे अहिराणी गाणे संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल याची मला खात्री आहे." या दरम्यान गीतकार गायक प्रवीण माळी यांनी स्वतः त्यांच्या भारदस्त आवाजात गाणे सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
शिवलाईन इन्कम ग्रोथ प्रा.लि. निर्मित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ चे सहनिर्माते चंद्रकांत विसपुते असून संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. बाविस्कर ग्रुप, नवी मुंबई यांचे प्रमुख सहकार्य या चित्रपटाला लाभले आहे. स्वप्नील मयेकर दिग्दर्शित तसेच अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या सर्वांच्या महत्वपूर्ण भूमिका असलेला चित्रपट ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा आहे. या सिनेमाचे संगीत लेबल झी म्युझिक कंपनी असून पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसिंगचे काम यूएफओ तर्फे झाले आहे.
ऍक्शन, इमोशन्स आणि दर्जेदार डायलॉग्ज असलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - Eid Celebration : सलमान खानला किस केल्यामुळे शहनाज गिल ट्रोल झाली