मुंबई - वास्तविकता आणि मराठी चित्रपट हातात हात घालून चालत असतात. त्यामुळेच बरेच मराठी चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवत असतात. त्या यादीतील अजून एक चित्रपट म्हणजे घोडा. विविध महोत्सवांमध्ये कौतुक झालेल्या घोडा चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. या चित्रपटात कैलास वाघमारे मुख्य भूमिकेत असून त्याचे दिग्दर्शन
टी. महेश यांनी केलं आहे.
घोडा चित्रपटाचे कथानक - बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलासाठी आणलेला घोडा पाहून तसा घोडा आणण्याची मागणी करतो. पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेले त्याचे वडील काय धडपड करतात त्याची गोष्ट घोडा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. हृदयस्पर्शी कथानक, उत्तम कलाकार, अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झालेल्या घोडा या चित्रपटाविषयी आता नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठी चित्रपट नेहमीच आशयाला महत्त्व देत आले आहेत. घोडा या नव्या संकल्पनेचा चित्रपट तयार करणे किंवा अशा विषयावरील चित्रपट बनवणं हे मोठे आव्हान दिग्दर्शकाने पेलल्याचे अनेक चित्रपट महोत्सवातून सिध्द झालं आहे. या चित्रपटाचे समिक्षकांनीही भरपूर कौतुक केले आहे. त्यामुळे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणे हे रसिकांसाठी पर्वणी असू शकते.
घोडा चित्रपटाच्या कलाकारांविषयी जाणून घ्या - स्वप्न पाहणं, ती पूर्ण करण्यासाठी धडपडणं, त्या दरम्यान माणसाच्या वेगवेगळ्या वृत्ती अनुभवास येणं असा प्रवास असलेला घोडा हा चित्रपट असून टी. महेश फिल्म्सच्या टी. महेश आणि अनिल बबनराव वणवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच उमेशचंद्र शिंदे आणि नयन चित्ते सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन टी. महेश यांनी केलं आहे. जमीर अत्तार यांनी कथा आणि गीतलेखन, महेशकुमार मुंजाळे, जमीर अत्तार आणि निलेश महिगावकर यांनी पटकथा लेखन, संवादलेखन निलेश महिगावकर, योगेश एम. कोळी यांनी छायांकन केलं असून रोहन पाटील यांनी संकलन केले आहे.अभिनेता कैलास वाघमारे, अर्चना खारतुडे, दिलीप धनावडे, राहुल बेलापूर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, वज्र पवार यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
आगामी मराठी चित्रपटाची आकर्षणे - जग्गू आणि जुलिएट हा मराठी सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाकडूनही बऱ्याच अपेक्षा बाळगल्या जात आहेत. या चित्रपटानंतर घोडा हे मोठे आकर्षण १७ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हे दोन महत्तवाचे रिलीज मानले जातात. नागराज मंजुळे, सयाजी शिंदे व आकाश ठोसर यांची मुख्या भूमिका असलेला घर बंदूक बिर्याणी हा एक वेगळ्या विषयावरील चित्रपट पुढील महिन्यात ३० मार्च रोजी रिलीज होत आहे.
'घोडा' येत्या १७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.