मुंबई - Prasad Khandekars directorial debut : मराठी मनोरंजनसृष्टीत एकांकिका, नाटकं, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांना मनोरंजित करणारा एक अवलिया कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करणारा कलाकार प्रसाद खांडेकर छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना गुदगुल्या करीत हसविताना दिसतो. आता एक पायरी पुढे जात तो आता चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलाय. 'एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणार नाही' या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रसाद खांडेकर याने लिहिले असून या चित्रपटातून तो दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.
विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर याने महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून विविधांगी पात्रे पेश केली आहेत. आता तो विविध विनोदी पात्रे घेऊन 'एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणार' हा एक बहुढंगी आणि बहुरंगी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतरंगी विनोदाची निरनिराळी शैली असणारे भन्नाट विनोदी कलाकार या चित्रपटातून दिसणार आहेत. नावावरूनच कल्पना येते की हा विनोदी चित्रपट आहे. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार ही स्टारकास्ट बघून त्यावर शिक्कामोर्तबच होतं.
परितोष पेंटर यांनी 'एकदा येऊन तर बघा' ची कथा लिहिली असून पटकथा व संवाद प्रसाद खांडेकर यांनी लिहिले आहेत. मंदार चोळकर यांच्या गीतांवर रोहन-रोहन आणि कश्यप सोमपुरा यांनी संगीतसाज चढविला आहे. कॅमेरामन योगेश कोळी असून निलेश गावंड यांनी संकलकाची भूमिका निभावली आहे. परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर हे या चित्रपटाचे निर्माते असून सहनिर्मिती केली आहे अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांनी.
अस्सल मराठमोळ्या कॉमेडीचा तडका मारलेली, लहान-मोठे सगळयांना पोट भरून हसवणारी, मनोरंजनाची हमखास गॅरंटी असलेली भरपेट मेजवानी, 'एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणार नाही' येत्या २४ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
१. Taapsee Pannu Shared Pictures : तापसी पन्नूनं बॉयफ्रेंड मॅथियास बोएसोबतचे फोटो केली शेअर
२. Sunny Deol : सन देओल धर्मेंद्रसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर, पिझ्झा खातानाचा फोटो व्हायरल
३. Jai Ganesha song from Ganpath : टायगर श्रॉफच्या 'गणपथ'मधील जय गणेशा गाणे रिलीज