मुंबई - राष्ट्रीय चित्रपट दिन या शुक्रवारी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे. यानिमित्ताने केवळ ७५ रुपयांच्या तिकिटामध्ये तुम्हाला कोणताही चित्रपट थिएटरात पाहता येणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला याची घोषणा करण्यात आली होती आणि आजपासून म्हणजेच मंगळवारपासून 75 रुपयांच्या चित्रपटाच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. ही ऑफर PVR, INOX, Cinepolis आणि इतर प्रमुख चित्रपटगृहांवर लागू आहे. 75 रुपयांचे चित्रपटाचे तिकीट केवळ एका दिवसासाठी असेल आणि देशभरातील 4,000 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध असेल.
महाराष्ट्रात काय स्थिती? - या संदर्भात माहिती देताना मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे जनसंपर्क अधिकारी सांगतात की, "याला महाराष्ट्रातील चित्रपट प्रेमींचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात पीव्हीआर, आयनॉक्स, Cinepolis अशा विविध ठिकाणी उद्याची तिकीट खरेदीसाठी प्रेक्षकांचा उत्साह दिसतो. त्यामुळे उद्याचा नॅशनल मल्टिप्लेक्स डे महाराष्ट्रात उत्साहात साजरा होईल अशी आम्हाला आशा आहे."
ही राज्ये होणार नाहीत सहभागी - चित्रपटगृहे आणि तिकीट दरांवरील राज्य सरकारच्या नियमांमुळे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळसह काही काही राज्यांमध्ये राष्ट्रीय मल्टिप्लेक्स दिन साजरा होणार नाही. मात्र, उर्वरित सर्व राज्यांमधील सहभागी चित्रपटगृहे राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त विशेष ऑफर देतील, चित्रपट पाहणाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी या ऑफरसाठी सहभागी सिनेमांच्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया हँडलचा संदर्भ घ्यावा.
ब्रह्मस्त्र व्यतिरिक्त कोणता चित्रपट? - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र (ब्रह्मास्त्र: भाग एक - शिवा) चित्रपटासाठी 75 रुपयांच्या चित्रपटाच्या तिकिटांमध्ये सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळत आहे, पण तुम्ही आणखी बरेच चित्रपट पाहू शकता. यामध्ये सनी देओलचा नवा चित्रपट चुप आणि अवतार यासह अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
कसं कराल बुकिंग? - चित्रपटाची तिकिटे ऑनलाइन बुक करण्यासाठी, तुमच्या शहरातील प्रमुख सिनेमागृहाच्या जसे की PVR, INOX इत्यादी वेबसाइटला भेट द्या. तेथे तुमचा प्रदेश/शहर आणि थिएटर निवडा. यानंतर, तुम्ही चित्रपट आणि चित्रपटाची वेळ निवडून बुकिंग पूर्ण करू शकता. तुम्ही BookMyShow, Paytm आणि इतर थर्ड पार्टी अॅप्सवरूनही चित्रपटाची तिकिटे बुक करू शकता.
हेही वाचा - National Cinema Day: २३ सप्टेंबर रोजी फक्त ७५ रुपयात पाहता येणार मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा