मुंबई - गेल्या काही महिन्यांत भारतीय संगीतक्षेत्रातील अनेक तारे निखळले. लता दीदी, बप्पी दा सारख्या दिग्गजांनंतर सुप्रसिद्ध गायक के के याचे अकस्मात निधन झाले. काल रात्री कोलकाता येथील एका कार्यक्रमादरम्यान त्याला त्रास जाणवू लागला. त्याने ‘हम रहे या ना रहे कल’ गाणं गायलं होतं आणि काही वेळातच तो मंचावर कोसळला. त्याला कोलकातामधील कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि तो तीव्र होता त्यामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला असावा असे सांगण्यात आले. मृत्यूसमयी के के केवळ ५३ वर्षांचा होता. त्याच्या अनपेक्षित निधनाने चित्रपट संगीत क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
कृष्णकुमार कुनाथ हे के के चे पूर्ण नाव. के केचा जन्म दिल्लीचा. पी सी मेनन आणि कुणानाथ कनकवल्ली ही त्याच्या पालकांची नावे. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या के के ने संगीतातले कुठेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते. दिल्लीच्या माऊंट मेरी स्कूल आणि किरोडीमल कॉलेज मध्ये शिक्षणादरम्यान त्याने अनेक सांगीतिक कार्यक्रमांत भाग घेतला. त्याचा निरागस आणि गोड आवाज ऐकल्यावर कौटुंबिक परिचयातून त्याला एक जिंगल गाण्यास मिळाले. त्याची पहिली जिंगल होती सँटोजन सूटिंग साठी आणि त्यानंतर के के ने ३५०० हून अधिक जिंगल्स गायल्या.
संगीतकार ए आर रहमान यांनी के के ची प्रतिभा ओळखली आणि त्याने आपले पहिले फिल्मी गाणे गायले. त्यानंतर विशाल भारद्वाज यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली त्याने गुलझार दिग्दर्शित माचीस मध्ये छोड आए हम हे पहिले हिंदी गाणे गायले. परंतु सलमान खान आणि ऐश्वर्या राय अभिनित हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या गाण्याने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. के के नेहमी पडद्यामागे राहण्यास पसंती देत असे. ‘माझी गाणी माझा चेहरा आहे’, असे त्याने एकदा आपल्या मुलाखतीत सांगितले होते. १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा दर्शविणारे ‘जोश ऑफ इंडिया’ गाणे त्याने गायले होते ज्यात या गाण्यात भारतीय क्रिकेट संघाच्या सदस्यांनी देखील भाग घेतला होता.
मुलायम आणि गोड गळ्याचा मालक असलेल्या के के ने १९९९ मध्ये ‘पल’ हा त्याचा पहिला सांगीतिक अल्बम लाँच केलाहोता. त्यातील पल आणि यारों ही गाणी खूप लोकप्रिय झाली आणि ती आजही शाळांच्या शेवटच्या दिवशीच्या निरोपावेळी हमखास वाजविली जातात. यावरून कल्पना येईल की के के च्या आवाजातील जादू काय होती. हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप, तमिळ गाणे आपडी पोडू, देवदास मधील डोला रे डोला, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है ही त्याच्या लोकप्रिय गाण्यांमधील काही. तसेच ओम शांती ओम मधील आँखों में तेरी, बचना ए हसीनो मधील खुदा जाने, आशिकी २ मधील पिया आये ना, मर्डर ३ मधील मत आजमा रे, हॅप्पी न्यू इयर मधील इंडिया वाले आणि बजरंगी भाईजान मधील तू जो मिला ही गाणीदेखील के केची अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. के के ला सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले होते आणि साऊथ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
के केने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषांमधील चित्रपटांत पार्श्वगायन केले होते. त्याच्या पाठी त्याची पत्नी ज्योती आणि मुले नकुल कृष्ण कुनाथ आणि मुलगी तमारा कुनाथ हा परिवार पोरका झाला आहे. कृष्णकुमार कुनाथच्या आत्म्यास शांती लाभो ही ईटीव्ही भारत मराठी ची विनम्र श्रद्धांजली.
हेही वाचा - केकेच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, गाताना स्टेजवरुन असा निघाला होता गायक