मुंबई - बॉलिवूडचा दमदार अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नाची वारंवार चर्चा होत आहे. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि राहुल लवकरच लग्न करणार आहेत. या वृत्तात म्हटले आहे की, या जोडप्याच्या लग्नासाठी लग्नाचे ठिकाणही निवडण्यात आले आहे. यापूर्वी अथिया आणि राहुलने त्यांच्या नात्यावर जाहीरपणे शिक्कामोर्तब केले होते, त्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाबद्दल उत्सुक आहेत.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अथिया-राहुलचे लग्न मुंबईतील कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार नाही, तर खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या 'जहाँ' या बंगल्यात मोठ्या थाटामाटात होणार आहे.
राहुल आगामी क्रिकेट मालिकेत गुंतलेला असेल, हे लक्षात घेऊन लग्नाच्या तारखेवर चर्चा केली जाईल. दरम्यान, लग्नाच्या आयोजकांनी खंडाळ्याला भेट दिली असून त्या आधारे लग्नाची तयारी होणार आहे.
यापूर्वी सुनील शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले होते की, केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी ठरवल्यानंतरच ते लग्नाची तयारी सुरू करतील. सुनिल शेट्टी पुढे म्हणाला, 'मला वाटतं, मुलं जसं ठरवतील तसे होईल. राहुलचे क्रिकेटचे वेळापत्रक आहे. सध्या आशिया कप, विश्वचषक, दक्षिण आफ्रिका दौरा, ऑस्ट्रेलिया दौरा आहे. मुलांना ब्रेक मिळाला की मग लग्न होईल. लग्न एका दिवसात होऊ शकत नाही ना?
अथिया आणि राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीच्या काळात या जोडप्याने आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त केले नाही, परंतु हे जोडपे एकमेकांचे सोशल मीडिया स्टेटस लाईक करायचे. आता या जोडप्याचे चाहते लग्नाच्या तारखेची वाट पाहत आहेत.