मुंबई - प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे आपण सर्व जाणून आहोत. स्त्री किंवा बाई यांचे प्रत्येकाच्या जीवनातील स्थान खूप महत्त्वाचे असते. बायकांमध्ये असलेली सुप्त शक्ती कुटुंबांना अनेक संकटांवर मात करायला मदत करते. हीच स्त्री शक्ती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे आगामी मराठी चित्रपट 'बाईपण भारी देवा' मधून. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे करीत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेला 'महाराष्ट्र शाहीर' नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याबरोबर 'बाईपण भारी देवा' चा टीझर जोडण्यात आला आहे.
स्त्री ची अनेक रूपे असतात. आई, आजी, सासू, काकी, आत्या, मावशी आणि पत्नी अश्या वेगवेगळ्या रुपात ती प्रत्येकाच्या जीवनात अस्तित्वात असते. अश्या सगळ्या स्त्रियांचे भावविश्व 'बाईपण भारी देवा' मधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. भलेही हा चित्रपट स्त्रियांच्या विश्वात रमणारा असला तरी तिच्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येक पुरुषाला उत्सुकता असणारच आणि त्यातून बरेच काही शिकण्यासारखेही सापडेल असे निर्माते सांगतात.
बाईपण भारी देवा या चित्रपटात एका कुटुंबातील अर्धा डझन बहिणींची कथा मांडण्यात आली आहे. या सहा बहिणी जरी लहानपणी प्रेमाने एकत्र वाढल्या असल्या तरी त्या आता एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत. प्रत्येक बहीण आपापल्या संसारात रमलेली असून कौटुंबिक समस्यांनाही सामोरी जाते. या सर्वांचे आयुष्य सामान्य महिलांसारखे असून प्रेक्षकांना त्या आपल्यातीलच एक वाटून जातील एव्हढ्या खऱ्या व्यक्तिरेखा उभ्या केल्या गेल्या आहेत असे दिग्दर्शक मानतो. या स्त्रिया सामान्य जरी गणल्या जात असल्या तरी त्यांचे कार्य सुपर वुमन पेक्षा कमी नाही. यातील प्रत्येक स्त्री पात्र समाजातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणारे आहे.
'बाईपण भारी देवा' चे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, 'आयुष्यात स्त्री ला नेहमीच गृहीत धरले जाते. खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात तिचे योगदान खूप मोठे असते. गृहीत धरली गेल्यामुळे तिच्या भावनांचा विचार सहसा केला जात नाही. या वस्तुस्थितीची कल्पना असल्यामुळे मी 'बाईपण भारी देवा' मधून मी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून कथानक मांडलं असून ते प्रत्येक बाई ला भावेल आणि आपलेसे वाटेल असे आहे. या चित्रपटाचा टिझर महाराष्ट्र शाहीर बरोबर जोडलेला असल्याने प्रेक्षकांना माझ्या दोन वेगवेगळे विषय असलेल्या चित्रपटांची अनुभूती अनुभवता येईल.'
माधुरी भोसले आणि जिओ स्टुडियोजची निर्मिती असलेला 'बाईपण भारी देवा' ची सहनिर्मिती बेला शिंदे आणि अजित भुरे यांची आहे. यातील सहा बहिणींच्या भूमिका साकारल्या आहेत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांनी. 'बाईपण भारी देवा' येत्या ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - Gabriella Demetriades Pregnancy : अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स दुसऱ्यांदा गर्भवती, फोटोंसह दिली बातमी