मुंबई - Junaid Khan Bollywood Debut : अनेक नायक नायिकांना त्यांच्या स्वप्नातील स्थान मिळवून देण्यात यशराज फिल्म्सचा मोठा हात आहे. अनेक स्टार्ससाठी यशराज फिल्म्सनं लाँचिंग पॅड म्हणून काम केलंय. आदित्य चोप्रा लीड करत असलेल्या या बॅनरनं आजवर रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, परिणिती चोप्रा, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि वाणी कपूर यांसारख्या उत्कृष्ट कलावंतांना संधी दिली आणि या कलाकारांनी संधीचं सोनं करुन दाखवलं. आदित्य चोप्रा आता आमिर खानचा मुलगा जुनैद खानला 'महाराजा' या चित्रपटातून लॉन्च करण्यासाठी सज्ज झालाय.
आमिर खानचा मुलगा जुनैद खान यशराज फिल्म्सच्या आगामी 'महाराज' या चित्रपटातून पदार्पण करेल. यासाठी नेटफ्लिक्सने यशराज फिल्म्ससोबत भागीदारी केली असल्याचा दावा फिल्म इंडस्ट्रीतील जाणकारांकडून समजत आहे. नेटफ्लिक्स इंडियानेही इन्स्टाग्रामवर या बातमीला दुजोरा दिला आहे. यात त्यांनी लिहिलंय, 'नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्स ब्लॉकबस्टर्सचे नवीन युग आणण्यासाठी हात मिळवणी करण्यासाठी लवकरच एकत्र येत आहेत.' यशराज फिल्म्सने ही भागीदारी जुनैद खानच्या लॉन्चिंग चित्रपटासाठी केली असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत, शर्वरी आणि शालिनी पांडे यांच्या प्रमुख भूमिका असतील. देखील आहेत. नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्स यांच्यातील मजबूत युतीची सुरुवात 'महाराजा' चित्रपटापासून होईल.
खरंतर यशराज आणि नेटफ्लिक्स एकत्र काम करण्याची ही पहिली वेळ नाही. यश चोप्रा यांच्या चित्रपट कारकिर्दीवर आधारित 'द रोमँटिक्स' ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रसारित झाली होती. भारतातील हिंदी चित्रपटाच्या विकासाचे हे एक दस्ताऐवजीकरण होते. आता मात्र नेटफ्लिक्स आणि यशराज 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून आपली युती बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.
'महाराजा' चित्रपटाची कथा विपुल मेहता आणि स्नेहा देसाई यांनी लिहिलेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'हिचकी' फेम सिद्धार्थ पी. मल्होत्रा करणार आहे. हा एक सत्यकथेवर आधारित वास्तववादी चित्रपट असणार आहे.
या चित्रपटाची कथा 1800 च्या दशकातील सामाजिक थ्रिलर असेल. यात जुनैद खान सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणाऱ्या एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत खलनायकाची भूमिका करताना दिसेल. शर्वरी आणि शालिनी पांडेच्या पात्रांबद्दलचा तपशील अद्याप कळलेला नाही. यशराज फिल्म्सच्या वतीने या चित्रपटाबद्दलची घोषणा लवकरच केली जाईल असा अंदाज आहे.
हेही वाचा -
२. Deepika Padukone Bond With Srk : दीपिका पदुकोणनं उलगडलं शाहरुख खानसोबतच्या नात्याचं रहस्य
३. Rashid Khan Meets Ranbir Alia : रणबीर आलियाच्या भेटीने रशिद खानचा आनंद गगनात मावेना