मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखर विरुध्द २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. तिला दिल्लीतील ईडी कार्यालयात बोलावून जबाबही नोंदवण्यात आला होता. आता या प्रकरणाची चार्जशीट तयार झाली असून यात जॅकलिनच्या नावाचा समावेश असल्याची खात्रीलायक बातमी आहे.
सुकेश चंद्रशेखर खंडणी प्रकरण - दोनशे कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Accused Sukesh Chandrashekhar) हा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा आणि अभिनेत्री जॅकलिनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो ज्यावेळी सुकेश हा जामिनावर बाहेर होता तेव्हाचा असल्याचे सांगितले जात होते. जॅकलिनला तो चेन्नईमध्ये चार वेळा भेटला होता, या भेटीसाठी त्याने प्रायव्हेट जेटची व्यवस्था केल्याचे सांगितले जात होते.
जॅकलिन फर्नांडिसवर बक्षिसांची खैरात - जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश चंद्रशेखर यांनी भेट म्हणून 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर भेट दिल्याचे समोर आले होते. तसेच, त्याने जॅकलिनला अनेकवेळा महागडे दागिनेही भेट दिले होते. सुकेश याच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती उघड झाली आहे. या आरोपपत्रात जॅकलिनसोबत आणखी एक अभिनेत्री नोरा फतेही हिचेही नाव आहे.
या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस ही ईडीसमोर 20 ऑक्टोबरला हजर झाली होती. तत्पुर्वी तीने चौकशीला सलग चारवेळा दांडी मारलील होती. जॅकलिनचा जबाब कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यातंर्गत नोंदवण्यात आला होता. तिचे आर्थिक व्यवहार आणि सुकेश चंद्रशेखरसोबत तिची ओळख यामुळे ती ईडीच्या रडारवर आली.
हेही वाचा - ED attaches Jacqueline's property : ईडीने जॅकलिन फर्नांडिसची ७ कोटी रुपयांची संपत्ती केली जप्त