मुंबई - २००४ साली प्रदर्शित झालेला महेश भट निर्मित आणि अनुराग बासू दिग्दर्शित ‘मर्डर’ हा चित्रपट त्यातील २१ चुंबन दृश्यांसाठी गाजला होता. त्यातील नायक इम्रान हाश्मी ला ‘सिरीयल किसर’ ही उपाधी मिळाली होती. महत्वाचं म्हणजे मर्डर चित्रपटाची नायिका मल्लिका शेरावत आपल्या पहिल्याच चित्रपटात तिच्या बोल्ड अंदाजामुळे एका रात्रीत स्टार बनली होती. या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत नंतर तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली होती. मध्यंतरी ती हिंदी चित्रपटांतून गायब झाली असली तरी ती आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून जगप्रसिद्ध विदेशी कलाकारांसोबत चमकत होती. गेली बरीच वर्ष परदेशात वास्तव्यास असलेली मल्लिका आता पुन्हा बॉलिवूड मध्ये जोमाने कार्यरत होण्यास सज्ज झाली असून, तिची प्रमुख भूमिका असलेला ‘आरके/आर के’ ( rk rkay ) हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याच पार्श्वभूमीवर मल्लिका शेरावतने ( Mallika Sherawat ) आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम बरोबर खास बातचीत केली.
‘मर्डर’ चित्रपटातील ‘बोल्ड’ सीन्स देण्याची हिंम्मत कुठून मिळाली? - खरं सांगायचं तर मला ‘ते’ सीन्स ‘बोल्ड’ वाटलेच नाहीत. किंबहुना आताच ‘गहरायियां’ बघितल्यावर ‘मर्डर’ पुळचट वाटू शकतो. परंतु, त्यावेळी सामाजिक मानसिकता वेगळी होती आणि मला महेश भट यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच, जेव्हा अनुराग बासूंनी मला पटकथा ऐकविली होती, त्यावेळी मला त्यात काहीच गैर वाटले नव्हते. चित्रपटातील विवाहबाह्य संबंधात शारीरिक आकर्षण दाखविले नाही तर कथेतील मजाच निघून गेली असती. तसेच त्यातील सीन्स खूप बीभत्स वाटणार नाहीत याची काळजी घेण्यात आली होती. त्यावेळी मी १८-१९ वर्षांची होते आणि त्या वयात आपण काहीही करून जग जिंकू शकतो हा आत्मविश्वास असतो. तसेच मी घर सोडून आले होते आणि माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. माझा अॅटीट्युड नेहमीच बंडखोरीकडे झुकणारा होता. मी चित्रपटसृष्टीत आलेच ते मुळी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि ‘ते’ देखील मनोरंजनाचं होते. तसं नसतं तर तो चित्रपट इतका गाजलाच नसता. त्यानंतर ‘मर्डर’ चे अजून दोन भाग निघाले. परंतु, पहिल्या भागांइतके ते चालले नाहीत. ‘ओरिजिनल, ओरिजिनल ही होता है’.
तुझा चित्रपटसृष्टीतील जवळपास दोन दशकांचा प्रवास कसा आहे? - असं काही बोलू नका, मला उगाचच वयस्क झाल्यासारखे वाटते. मी तर पुनःपदार्पण करीत आहे आणि त्याबद्दल मी खूप उत्साही आहे. हरियाणा सारख्या छोट्या राज्यातून आलेली मुलगी मुंबईत येऊन स्टारडम मिळविते ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मी वेलकम केलाय, कमल हसन बरोबर दसावतारम केलाय, जॅकी चॅन बरोबर फ्रांस मधील ‘कान’ च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतलीय. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा सोबत भेट झालीय, त्याचसोबत मी ‘पॉलिटिक्स ऑफ लव्ह’ हा पाश्चिमात्य चित्रपटसुद्धा केलाय. आता मी करीत असलेली ‘आरके/आर के’ चित्रपटातील भूमिका एकदम अनोखी आहे. माझ्या आयुष्यात मी अश्या प्रकारची भूमिका प्रथमच साकारत आहे. अर्थातच लेखक दिग्दर्शक रजत कपूर यांना मी श्रेय देईन की त्यांनी माझ्याकडून चांगल्या रीतीने काम करून घेतलं. मी ५०च्या दशकातील हिरॉईन (गुलाबो) साकारत आहे, तसेच या जमान्यातील (नेहा) देखील. दोन्ही भूमिकांमध्ये परस्परविरोधी वागणं आहे. ते करताना खूप मला आली. या चित्रपटात एक वेगळ्या प्रकारचा विनोद बघायला मिळेल. मला आशा आहे की या चित्रपटांनंतर माझा सशक्त भूमिकांसाठी विचार होईल. महत्वाचं म्हणजे ओटीटी वर सध्या अभिनेत्रींना सुगीचे दिवस आलेले आहेत. स्त्रीप्रधान कंन्टेन्ट बनत आहे ही आनंदाची बाब आहे.
‘इथले’ आणि ‘तिथले’ चित्रपट तू केले. काम करताना काही फरक जाणवला? - खूपच. विदेशी चित्रपटांच्या सेटवर खूप मेकॅनिकल वातावरण असते. आपलेपणाचा अभाव आढळतो. तेथील कामं सर्व रुल्स आणि वेळ सांभाळून केली जातात. त्यात यांत्रिकता जास्त असते. त्यांची वर्किंग स्टाईल खूप भिन्न आहे. फक्त तेथील चित्रपटांचे बजेट आपल्यापेक्षा खूप म्हणजे खूपच जास्त असते. तसेच कोणीही तुम्हाला ‘कॉम्प्लिमेंट’ देत नाहीत. त्यांना वाटते की त्यामुळे #MeTooची केस होईल. तिथे सेटवरील संपूर्ण वातावरण रोबोटिक असते.
तुझा लॉकडाऊन कसा गेला? - कोविड काळ लोकांचे डोळे उघडणारा होता. आजूबाजूचे वातावरण स्वच्छ झाले. ट्राफिक कमी होता. हवा साफ होती. लोकं आत्मनिर्भर झाली. मी फिलॉसॉफी मध्ये ग्रॅज्युएशन केलंय आणि स्वामी विवेकानंदांबद्दल बरंच वाचन केलंय. जेव्हा बाहेर जाण्यास परवानगी मिळाली तेव्हा मी कोलकाता ला गेले होते. तेथे मी विवेकानंदांच्या मठाला भेट दिली. मी खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहे आणि प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीत मी पॉझिटिव्ह गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करते. मी योगा करीत असल्यामुळे माझे मानसिक स्वास्थ्य उत्तम होते. लॉकडाऊन च्या काळातही मी कुठल्याही गोष्टीबद्दल तक्रार केली नाही. मी नेहमीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. महत्वाचं म्हणजे आयुष्यात प्रथमच मी चपात्या करायला शिकले.
सध्या सोशल मीडियाचे स्तोम वाढले आहे, त्यावर तुझे काय मत आहे? - ‘आय हेट सोशल मीडिया’. मी त्यावर फारशी ऍक्टिव्ह नाहीये. माझी टीम मला सांगत राहते की नवनवीन फोटो टाकत जा. परंतु मला ते काही जमत नाही. मी माझा सोशल मीडिया माझ्या टीमलाच हॅण्डल करायला सांगणार आहे. मी मोबाईलवर सुद्धा फार वेळ नसते. दिवसभर माझा फोन माझ्या सेक्रेटरीकडे असतो. पॅक-अप झाल्यावर मी मेल वगैरे चेक करते, बस. माझ्या मते सोशल मीडियावर लोक ‘फेक लाईफ’ जगताहेत. मला भेटून संभाषण करायला आवडते, जसे आपण आता करीत आहोत. मला तर वाटते की सोशल मीडिया बॅन व्हायला पाहिजे कारण तो आपल्या तरुणाईचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहे. आपली स्पिरिचुयल हेल्थ सुद्धा रसातळाला जाताना दिसतेय. पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करीत लोकं भौतिकवादी बनत चालले आहेत हे जाणवते.
तुझं रिलेशनशिप स्टेटस काय आहे?
सिंगल!
माझा विश्वास नाही बसत. बॉयफ्रेंड असेलच.....
मी खरं सांगतेय की माझा कोणीही बॉयफ्रेंड नाही. ते काय झाडावर लागलेले असतात काय, की गेलं आणि तोडून आणले. तुम्हाला माहीतच आहे की मी स्पष्ट बोलते. अरे, मला तर कोणी ‘डेट’ पण घेऊन जात नाहीये. कदाचित माझ्या स्पष्टवक्तेपणाला ते घाबरत असावेत. मी कोणासाठी बदलणार नाहीये. माझा बॉयफ्रेंड माझे ‘फुल पॅकेज अँड बॅगेज’ वाहणारा असायला पाहिजे. अर्थातच, प्राक्तन महत्वाचे.
हेही वाचा - 'मधुबाला' बायोपिकसाठी बहीण मधुर ब्रिजभूषणने कसली कंबर