मुंबई - India official entry 2018 out of Oscars race : 96 व्या अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने शुक्रवारी दहा वेगवेगळ्या श्रेणींमधील अंतिम स्पर्धकांची घोषणा केली. विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित विक्रांत मॅसी स्टारर '12th फेल' आणि टोविनो थॉमसचा "2018: एव्हरीवन इज ए हिरो" हे दोन चित्रपट ऑस्कर 2024 च्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मच्या शॉर्टलिस्टमध्ये स्पर्धेत होते. मात्र दोन्ही चित्रपट या शर्यतीतून बाहेर पडले असून यामुळे '2018' चे दिग्दर्शक ज्यूड अँथनी जोसेफ निराश झाले आहेत. त्यांनी ही यादी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जुड अँथनी जोसेफ यांनी दिग्दर्शित केलेला टोविनो-अभिनीत चित्रपट "2018: एव्हरीवन इज ए हिरो" हा चित्रपट 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या महापूराची कथा आहे. निसर्गाच्या या प्रकोपाला उत्तर देताना जेव्हा यंत्रणा कमी पडतात तेव्हा राज्य सरकारच्या आवाहनानुसार सामान्य लोक महापूरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतात. हे लोक हमाल, कोळी, युवक, विद्यार्थी, सर्व क्षेत्रातील कष्टकरी आपल्या परीनं पूराच्या पाण्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून उतरतात आणि एक मोठ्या संकटाचा सामना करतात. यापासून प्रेरणा घेत "2018: एव्हरीवन इज ए हिरो" या चित्रपटाची निर्मिती जुड अँथनी जोसेफ यांनी केली होती.
'2018' चे दिग्दर्शक जुड अँथनी जोसेफ यांनी इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागणारी एक लांबलचक नोट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले: "सर्वांना शुभेच्छा. ऑस्करच्या शॉर्टलिस्टचे लॉन्चिंग करण्यात आले आहे आणि खेदाची गोष्ट म्हणजे आमचा चित्रपट "2018- एव्हरीवन इज ए हिरो" ला अंतिम 15 चित्रपटांमध्ये स्थान मिळाले नाही. तुम्हा सर्वांची निराशा केल्याबद्दल मी माझ्या सर्व हितचिंतकांची आणि समर्थकांची मनापासून माफी मागतो. तरीही, या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी हा एक स्वप्नवत प्रवास आहे जो मी आयुष्यभर जपत राहीन. "
'2018' चित्रपटापूर्वी ऑस्करसाठी अधिकृत मल्याळम प्रवेशिका म्हणजे गुरू (1997), अदामिंटे माकान अबू (2011), आणि जल्लीकट्टू (2019) हे चित्रपट होते. मात्र, यापैकी एकाही चित्रपटाला नामांकन मिळाले नाही. २०२४ मध्ये भारत ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी झारखंड गँगरेप प्रकरणातील चित्रपट 'टू किल अ टायगर' सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या शर्यतीत आहे. निशा पाहुजा या टोरंटो स्थित दिग्दर्शिका यांनी बनवलेला हा एक आकर्षक माहितीपट आहे. यामध्ये भयंकर झारखंड गँगरेप प्रकरणाचा शोध घेण्यात आला आहे.
पुरस्कारासाठीची नामांकने 11 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत मतदानासाठी ठेवली जातात, तर अकादमी पुरस्कार नामांकित व्यक्तींची औपचारिक घोषणा 23 जानेवारी रोजी केली जाते. अंतिम मतदान 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान होईल, त्यानंतर 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळा 10 मार्च रोजी होणार आहे.
हेही वाचा -
2. शाहरुख खान स्टारर 'पठाण' आणि 'जवान'चे ओपनिंग डे रेकॉर्ड तोडण्यात 'डंकी' अपयशी
3. 'फायटर'मधील 'इश्क जैसा कुछ' गाणं लॉन्च, दीपिका आणि हृतिकच्या केमेस्ट्रीची चाहत्यांना भुरळ