मुंबई - Christian Klepser died : हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ख्रिश्चन क्लेपसर याचा कॅरिबियन बेटावर झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या दोन मुली मदिता (वय 10 ) आणि अॅनिक ( वय 12 ) यांनीही आपला जीव गमावला आहे.
ख्रिश्चन ऑलिव्हर या नावानेही ओळखला जाणारा अभिनेता ख्रिश्चन क्लेपसर यांनी 'स्पीड रेसर' आणि 'वाल्कीरी' सारख्या गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याने अलीकडेच 'इंडियाना जोन्स' या चित्रपटात काम करुन मनोरंजन जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. वयाच्या 51 व्या वर्षी या लोकप्रिय अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला.
ख्रिश्चन क्लेपसर आपल्या मुलींसह छोट्या विमानातून एफ मिशेल विमानतळावरून सेंट लुसियाला जात होता. विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच हा अपघात घडला आणि बेकियापासून कॅरिबियन पाण्यात विमान कोसळले. घटनेनंतर काही वेळाने मच्छीमार आणि गोताखोरांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नातून पायलट रॉबर्ट सॅक्ससह चारही मृतदेह बाहेर काढले. अपघाताचे कारण अद्यापही कळलेले नाही व याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
रॉयल सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलिस दलाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही घटना बेक्विआ बेटावर घडली आहे. छोटे सिंगल-इंजिन असलेले विमान पेजेट फार्म येथील जेएफ मिशेल विमानतळावरून सेंट लुसियाला जात होते. उड्डाणानंतर काही क्षणात, विमानाला अडचणी आल्या आणि ते समुद्रात कोसळले.
विमानात बसलेल्या तीन प्रवाशांची ओळख अधिकार्यांनी ख्रिश्चन क्लेपसर ( वय 51 ) आणि त्याच्या दोन मुली, मदिता (वय 10 ) आणि अॅनिक ( वय 12 ) अशी केली आहे. वैमानिकाची ओळख रॉबर्ट सॅक्स अशी आहे.
ख्रिश्चन क्लेपसरचा शेवटचा चित्रपट "फॉरएव्हर होल्ड युअर पीस" आता त्याच्या मृत्यूनंतर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक निक ल्योन यांनी या चित्रपटाच्या शुटिंगच्या शेवटच्या दिवसातील एक फोटो शोअर करुन आपल्या अनेक वर्षाच्या मित्राला श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा -