मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने परत एकदा आपली पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत लग्न केले आहे. उदयपूरमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी एका रोमँटिक कार्यक्रमात या प्रसिद्ध जोडप्याने पुन्हा एकदा आपला विवाह सोहळा साजरा केला. विशेष म्हणजे त्यांच्या या विवाहाच्या वेळी त्यांचा २ वर्षांचा मुलगा अगस्त्यही हजर होता. हार्दिकने इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाचे नवीन फोटो शेअर केले आहेत. तीन वर्षापूर्वी आम्ही एकत्र राहण्यासाठी दिलेल्या वचनाचे नुतणीकरण केल्याचे फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे. आमच्या प्रेमाचा हा खास दिवस साजरा करण्यासाठी आज आमच्यासोबत कुटुंबीय आणि मित्रही असल्याचे त्याने म्हटलंय.
![हार्दिक पांड्याचा नताशा स्टॅनकोविचसोबत पुन्हा विवाह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/hardik-1-4_1502newsroom_1676435892_797.jpg)
हार्दिक नाताशाची अनोखी प्रेम कहानी - हार्दिक पंड्या आणि नताशाची पहिली भेट एका डान्स शोमध्ये झाली होती. २०१७ मध्ये ती एक फरफॉर्मन्स करताना हार्दिकने पाहिले होते. तिच्या सौंदर्याने हार्दिक मंत्रमुग्ध झाला होता. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे फोन नंबर एक्स्चेंज केले व अधून मधून भेटत राहिले. त्यांनी आपल्या मैत्रीला चांगले फुलू दिले. लगेचच काही दिवसांनी ते डेटिंग करताना दिसले. त्यानंतर दुबईत २०२० मध्ये हार्दिक पांड्याने दुबईतील एका यॉटवर नताशाला प्रपोज केले. त्याने नौका फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजवली आणि तिला ताऱ्यांखाली प्रपोज केले. हार्दिकच्या रोमँटिक हावभावाने नताशा थक्क झाली आणि हो म्हणाली. नताशाने प्रपोजला होकार दिल्यानंतर सोशल मीडियावरुन हार्दिकने ही दवंडी जगाला दिली होती. त्यावेळी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या होत्या.
![हार्दिक पांड्याचा नताशा स्टॅनकोविचसोबत पुन्हा विवाह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/hardik-1-5_1502newsroom_1676435892_356.jpg)
हार्दिक आणि नताशाचे लग्न - हार्दिक आणि नताशा यांचा विवाह ३१ डिसेंबर २०२० रोजी गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडला. अतिशय मोजक्या लोकांच्या हजेरीमध्ये हा सोहळा पार पडला. विवाह प्रसंगी दोघांनीही पारंपरिक कपडे परिधान केले होते. गेली तीन वर्षे हे जोडपे अत्यंत आनंदाने संसार करत आले आहे. दोघांच्या सुखी संसारात अगस्त्य हा मुलगा आला आहे. हार्दिक अनेकदा आपल्या मुलासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी दाखवत असतो.
![हार्दिक पांड्याचा नताशा स्टॅनकोविचसोबत पुन्हा विवाह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/hardik-1-6_1502newsroom_1676435892_871.jpg)
नताशा स्टॅनकोविच कोण आहे - नताशा ही भारतीय चित्रपट व्यवसायात अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे. नोवी सॅड, सर्बिया येथे जन्मलेल्या नताशाने 2001 मध्ये रोमानियामध्ये कला आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर तिने कला विद्यापीठ, बेलग्रेड, सर्बिया येथून कला विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 2012 मध्ये मुंबईत आल्यानंतर तिने जाहिरातींसाठी काम करण्यास सुरुवात केली. जॉन्सन अँड जॉन्सन, ड्युरेक्स अशा विविध उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये दिसल्यानंतर ती बॉलिवूड चित्रपटांकडे वळली. 21 सप्टेंबर 2014 रोजी ती बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. तिने 2014 मध्ये अक्षय कुमारच्या हॉलिडे या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, सत्याग्रहमध्ये एक नृत्यामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. बिग बॉसच्या आठव्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर तिने हिंदी भाषा शिकायला सुरुवात केली.अॅक्शन जॅक्शन, सेव्हन अवर टू गो, डॅडी, फ्रायडे, लुप्त, झिरो अशा असंख्य बॉलिवूड चित्रपटातून ती झळकली आहे.