मुंबई - कुठल्याही कलाकाराला पुरस्कार अजूनही उत्तम काम करण्याची ऊर्जा देतात. त्यात तो पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार असेल तर आकाश ठेंगणं वाटतं. नुकत्याच घोषित झालेला ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांत गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कलाकारांची मांदियाळी - शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
वैशिष्ठ्यपूर्ण पैठणी - सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी... पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य... आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येण्या आधीच यंदाच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ''गोष्ट एका पैठणीची'' या चित्रपटाने पटकावला आहे.
स्वप्नांचा पाठलाग - प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. आशा निराशेने सजलेला स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो जणू एखाद्या पैठणी सारखा.. रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आता लवकरच येणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी केले अभिनंदन - 'मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या विविध श्रेणीतील चित्रपटांचे निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ज्ञ आदींचे अभिनंदन केले आहे.