मुंबई - कधी मध्यमवर्गीय तर कधी बिलंदर राजकारणी, कधी साधा तर कधी खुँखार खलानायक अशा विविध भूमिकांमध्ये सहज चपखल मिसळून जाणारा, मराठी रंगभूमी ते मोठा पडदा यावर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन खेडेकर यांचा आज जन्मदिन. प्रसिध्दीपासून शक्य तितक्या पातळीवर अंतर राखून असलेल्या सचिन यांनी आपला एक स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या आवाजाचेही अनेकजण फॅन आहेत.
आज मराठीमध्ये गाजलेल्या चित्रपटांची यादी काढली तर अर्धा डझन चित्रपटात सचिन यांचीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे. काकस्पर्श, कोकणस्थ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, आजचा दिवस माझा, शिक्षणाच्या आईचा घो, फक्त लढ म्हणा हे काही चित्रपटांची वानगीदाखल नावे आहेत.
खरंतर सचिन खेडेकरांचा एकंदरीत प्रवास अतिशय सामान्यपणे झाला. मुंबईतील विले पार्लेमध्ये जन्मलेल्या सचिन यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. पुढे सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केले. दरम्यान रंगमंचावर त्यांचा वावर सुरू झाला होता. इतरत्र नोकरी करण्यापेक्षा अभिनयातच करियर होऊ शकेल का हा विचार याकाळात त्यांचा सुरू झाला होता. सचिन खेडेकरांचा मूळ पिंड हा रंगमांचावरील अभिनेत्याचा. अनेक हौशी नाटकांपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास प्रायोगिक ते व्यावसायिक नाटकापर्यंत पोहोचला. रंगभूमीवर ज्या नटांनी नाव कमावले त्यांचा छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रवास फार कठीण जात नाही.
जीवा सखा, विधीलिखीत अशा चित्रपटातून त्यांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी सचिन यांना मिळाली. पण १९९३ मध्ये आलेल्या आपली माणसं या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिका खूप स्मरणात राहणारी ठरली. आपल्याच बापाला कोंडून ठेवणारा विचीत्र आणि स्वार्थी मुलगा त्यांनी साकारला होता. त्यानंतर जिद्दी या हिंदी चित्रपटात त्यांना भूमिका करण्याची संधी मिळाली आणि सचिन यांनी त्याचे सोने केले. त्यानंतर सचिन यांनी मागे वळून पाहिलेच नाही. हिंदी, तमिळ, तेलुगु, मरााठी, मल्याळम यासह अनेक भारतीय भाषांमध्ये सचिन खेडेकर यांनी दिडशेहेहून अधिक चित्रपट भूमिका केल्या आहेत.
बोस: द फरगॉटन हिरो हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महात्त्वाचा चित्रपट आहे. श्याम बेनेगल यांच्या या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना सचिन यांची ओळख करुन दिली. आज त्यांचा वावर टीव्हीवरही सन्मानाने सुरू आहे. कोण बनणार मराठी करोडपती या शोचे अँकरींगही त्यांनी केले आहे.
सचिन खेडेकर यांना दूरदर्शनवर सैलाब या मलिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्क्रिन पुरस्कार मिळाला आहे. तसेच कदाचित आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटांसाठी देखील त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. बोस: द फरगॉटन हिरो या चित्रपटासाठी त्यांना ऐतिहासिक चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. घराबाहेर या चित्रपटासाठी त्यांना राज्य शासनाचा पूरस्कार मिळाला आहे. असा या चतुरस्त्र अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
हेही वाचा - 24 वर्षांच्या संसारानंतर सोहेल खान, सीमा खानचा काडीमोड, घटस्फोटासाठी केला अर्ज