ठाणे : नजीकच्या काळात बरेच बायोपिक बनले. परंतु ज्या बायोपिकची बहुप्रतीक्षा होती तो म्हणजे लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. याच धर्मवीर मु. पो. ठाणे चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशन सोहळा मुंबई येथे अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपस्थित होते तसेच सुपरस्टार सलमान खान सुद्धा जातीने हजर होता.
काय म्हणतात मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे म्हणाले की, "मी आनंद दिघे साहेबांसोबत एका दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी मी पाहिले होते ते काम करताना तहानभूक विसरुन काम करत असत. प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या सारखे काम करावे. ते प्रत्येकाला प्रेमाने व आपुलकीने जवळ करत. असा नेता पुन्हा होणे नाही. ज्या वेळी ते गेले त्यावेळी त्यांचे वयं पन्नास होते. मी म्हणेन या पन्नास वर्षांत ते शंभर वर्षांचे आयुष्य जगले. चोवीस तास ते कामाला वाहिलेले होते. त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी ‘धर्मवीर' जरूर पाहावा "
प्रेक्षकांचा कमालीचा प्रतिसाद
माननीय एकनाथ शिंदे म्हणाले, "'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आहे. आनंद दिघे यांचे विचार जसे भव्यदिव्य होते तसाच हा चित्रपटही भव्यदिव्य आहे. ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटाचे मोठमोठे होर्डिंग्ज लागतात. तसेच होर्डिंग्ज आता मराठी चित्रपटाचेही लागत आहेत. नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपली चांगली जागा निर्माण करेल."
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई आणि साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या १३ मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - Prithviraj trailer: सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या अतुलनिय शौर्याची महान गाथा