मुंबई - महाराष्ट्राची लोककला आणि नृत्यकला यांना मूर्त रूप देणारी कला म्हणजे लावणी. महाराष्ट्राने नेहमीच आपल्या संस्कृतीचा, कलेचा, साहित्याचा वारसा जपलाय. या दैदिप्यमान वारसात लावणी जगवून ठेवण्याचे काम काही मोजक्या मंडळींनी केलंय आणि करताहेत. ही लोककला लुप्त होऊ नये म्हणून अनेकजण अखंडपणे झगडताना दिसतात. लावणी ही लोकनृत्यकला जपण्यासाठी गेली अनेक वर्षे कलर्स मराठी ही वाहिनी सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. आता ही वाहिनी घेऊन येत आहे लावणीचा महामंच 'ढोलकीच्या तालावर' या प्रसिद्ध कार्यक्रमाचा नवीन सिझन.
'ढोलकीच्या तालावर' हा एक नृत्य रियालिटी शो असून यात लावण्या पेश केल्या जातात आणि विजेतीला लावणी सम्राज्ञी हा किताब मिळतो. महाराष्ट्राचे संस्कृती वैशिष्ठ्य आणि लोककला व नृत्यकला यांची ओळख म्हणजे लावणी. लावणी म्हणजे अदाकारी, नृत्य आणि ताल यांचा त्रिवेणी संगम. हीच लावणी निरनिराळे स्पर्धक निरनिराळ्या शैलींमध्ये सादर करतात आणि या कार्यक्रमाचे जजेस त्याचे मूल्यमापन करतात. यावर्षी परीक्षकांच्या खुर्चीत बसणार आहेत, महाराष्ट्रातील नामांकित व्यक्तिमत्वे. अभिनेत्री - दिग्दर्शिका क्रांती रेडकर, लेखक - दिग्दर्शक - निर्माते अभिजीत पानसे, लावणी सम्राट नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील हे स्पर्धकांना मार्गदर्शन करीत त्यांच्या नृत्याचे मूल्यमापन करणार आहेत. तसेच अभिनेता अक्षय केळकर, ज्याने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझन चा चषक जिंकला होता, 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.
महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या लावणी या नृत्य प्रकाराला आजही अनेक प्रेक्षक पाठिंबा देताना दिसतात. 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमामुळे या नृत्यप्रकाराभोवती असलेली संदिग्ध भावना संपुष्टात आली असून या नृत्यप्रकाराला पुन्हा एकदा मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. लावणीच्या या महामंचावर महाराष्ट्रातील आजच्या लावण्यवती थिरकणार आहेत आणि महाराष्ट्राला मिळणार आहे नवीन लावणी सम्राज्ञी. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली की, 'मला स्वतःला नृत्य खूप आवडते. मी कथ्थक शिकले आहे त्यामुळे शास्त्रीय शैली आणि अदाकारी यावर माझे विशेष लक्ष असेल. तरीही मी यातील स्पर्धकांना परीक्षक म्हणून नव्हे तर मैत्रीण म्हणून सल्ले देईन.'
नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील म्हणाला की, 'माझा नृत्यातील प्रवास आणि त्यातील आलेले अनुभव मला उत्तम परीक्षण करण्याची उर्मी देतील. आधी स्पर्धक, नंतर नृत्य दिग्दर्शक आणि आता परीक्षक असा माझा प्रवास मला खूप काही शिकवणारा आहे. गेली १८ वर्षे मी लावणी वर नितांत प्रेम केलंय आणि तो प्रकार जिवंत राहावं यासाठी परिश्रम घेतलेत. मी लावणी च्या कार्यक्रमाचा परीक्षक झालोय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.' निर्माते, दिगदर्शक आणि लेखक, अभिजीत पानसे म्हणाले के, 'माझा क्लासिकल डान्सिंगचा अभ्यास नाहीये. मी प्रथमच अशा कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहे. सादरीकरणात दिग्दर्शकाच्या नजरेतून काय चांगल वाईट दिसलं याबद्दल उहापोह करणार आहे. लावणी दिसते सोप्पी पण करायला तितकीच अवघड आहे हे मी जाणून आहे. त्यात अदा, अभिनय आणि नृत्य यांची सांगड घालत प्रेक्षकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची ताकद आहे. ते अनुभवायला मी उत्सुक आहे.' 'ढोलकीच्या तालावर' हा लावणी नृत्य रियालिटी शो सुरू होत आहे कलर्स मराठीवर १ जुलै पासून शनि आणि रवि रात्री ९.०० वा.
हेही वाचा -
१. Bawaal At The Eiffel Tower: वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या 'बवाल'चा आयफेल टॉवरवर होणार प्रीमियर
३. Anubhav Sinha Birthday: अनुभवातून प्रेक्षकांची नस ओळखलेला दिग्दर्शक अनुभव सिन्हा