मुंबई: अनिल कपूरची भूमिका असलेला राज मेहता दिग्दर्शित ‘जुगजुग जियो’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, मनीष पॉल, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या सोबत संवाद साधला यावेळी बोलताना त्याने मी कधीच कुठलाही ट्रेंड फॉलो केला नाही. नेहमीच भूमिका चांगली वाटली तरच चित्रपटासाठी होकार देतो. मी कधीच कुठलाही ट्रेंड फॉलो केला नाही माझ्या कुटुंबाने मला नेहमीच ताकत दिली. आणि हो, मी स्वतःची काळजी घेत आलो आहे, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्याही अशी ही माहिती त्याने यावेळी बोलताना सांगितली.
इतकी वर्षे ‘रिलेटेबल’ राहणे नक्कीच कौतुकास्पद आहे. कसं काय मॅनेज करता? : कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा. मी जे काही करतो ते आत्मीयतेने करतो. तुझ्यासोबत इंटरव्हू देताना मी तासनतास बोलू शकतो. कारण इंटरव्ह्यू देणं माझं काम आहे असं मी मानतो आणि ते मी एन्जॉय करतो. इतरांना कदाचित कंटाळा येत असेल मुलाखती द्यायला पण मी तब्बल ६-७ तास सहजपणे बोलू शकतो. माझ्या करियरमध्ये माझ्या वाट्याला चांगल्या फिल्म्स आल्या, छान छान कथानकं मिळाली, उत्तम दिग्दर्शक मिळाले त्यामुळे माझा करियर ग्राफ वर राहिला. महत्वाचे म्हणजे योग्यवेळी योग्य चित्रपटाला मी होकार दिला त्यामुळे माझ्या नावावर बरेच हिट चित्रपट आहेत. काही फ्लॉप्स असतील पण हिट चित्रपटांची संख्या खूप जास्त आहे. मी कधीच कुठलाही ट्रेंड फॉलो केला नाही. नेहमीच भूमिका चांगली वाटली तरच चित्रपटासाठी होकार दिलाय. तसेच माझ्या सभोवतालची लोकं नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारी होती, आहेत. माझ्या कुटुंबाने मला नेहमीच ताकत दिली. आणि हो, मी स्वतःची काळजी घेत आलो आहे, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्याही.
तुमच्या ‘जुगजुग जियो’ मधील भूमिकेबद्दल काय सांगाल? : चित्रपटातील माझ्या पात्राचे नाव भीम आहे. तो एक व्यावसायिक आहे जो खालून वर आला आहे आणि मोठे यश मिळविले आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. परंतु त्याच्या वैवाहिक आयुष्यात ‘मिड-लाईफ क्रायसीस’ आलीय. त्याला तोचतोचपणाचा उबग आला आहे. तो सामान्य जीवनाला कंटाळला आहे. त्याला वेगळी मजा करायची आहे आणि बायकोला घटस्फोट द्यायचा आहे. त्याच सुमारास त्याचा नवविवाहित मुलगाही घटस्फोटाचा विचार करतोय आणि आपल्या वडिलांचा निर्णय ऐकून शॉक मध्ये आहे. या सर्वापासून त्याची पत्नी अनभिज्ञ आहे. हे सर्व तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलेच असेल. ‘जुगजुग जियो’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच एक महत्वाचा संदेशही देईल, तुम्हाला हसवत हसवत.
या चित्रपटाचा दिग्दर्शक राज मेहता हा तसा नवखा आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? : राज (मेहता) चा हा दुसरा चित्रपट. पहिला ‘गुड न्यूज’ मध्ये त्याने निखळ मनोरंजन करीत महत्वाचा संदेश दिला होता. मला त्याची विनोदी प्रसंग चित्रित आणि प्रेझेंट करण्याची पद्धत आवडली. त्या चित्रपटात काहीही ओंगळ नव्हते. कोणताही प्रसंग शिसारी आणणारा नव्हता. आणि ही गोष्ट मला भावली. खरंतर हा चित्रपट मी धर्मा प्रॉडक्शन्स साठी केला. मला करण चे वडील यश जोहर सोबत काम करण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली नव्हती. करण (जोहर) ने जेव्हा मला या चित्रपटासाठी विचारले तेव्हा मी ताबडतोब होकार दिला. त्यानंतर करण ने कथा ऐकविली आणि मला ती खूपच आवडली. त्यानंतर राज बरोबर चर्चा झाल्या आणि माझी भूमिका उभारून येण्यास मदत झाली. राज चा विनोद बेगडी अथवा ओढून ताणून आणल्यागत नसतो. त्याने एक दर्शनीय, सर्वांना आवडेल असा ‘लव्हेबल’ सिनेमा बनविलाय. हा पूर्णतः कौटुंबिक चित्रपट आहे आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसून याचा आनंद घेऊ शकतील. मला नंतर समजले की नीतू कपूर माझ्या बायकोची भूमिका साकारणार आहे.
‘जुगजुग जियो’ मधून नीतू कपूर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करीत आहे. त्यांच्यासोबत काम करतानाच अनुभव शेयर केला तर आवडेल. : आमची खूप जुनी ओळख आहे. नीतू कपूर ची सासू म्हणजे स्व. कृष्णा राज कपूर आणि माझी आई यांचे सख्य होते, किंबहुना दोघी बहिणींसारख्या होत्या. त्यामुळे एकमेकांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी होतच असत. आम्ही दोघे, मी आणि नीतू, एकमेकांना ओळखत असल्यामुळे काम करताना सोप्प गेलं. नीतूजींच्या पूर्वीच्या कामाबद्दल प्रेक्षकांमध्ये आदर आहे. त्यांच्या पुनरागमनाकडे अनेकजण डोळे लावून असतील. एखादा कलाकार बराच काळ नजरेआड असतो तेव्हा त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालेले असते. तिचे प्रेक्षकांसोबत ‘इमोशनल कनेक्ट’ आहेच आणि नितूजींनी अप्रतिम काम केलंय. याचा प्रत्यय सिनेमा प्रदर्शित झाल्यावर सर्वांनाच येईल.
हेही वाचा : गुरु दत्त जयंतीनिमित्त बाल्कीने रिलीज केला 'चूप' चित्रपटाचा टीझर