मुंबई - जेव्हापासून हिंदी आणि साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील कलाकारांची देवाण घेवाण सुरु झाली तेव्हापासून अनेक बॉलिवूडचे स्टार्स पॅन इंडिया फिल्म्स मधून दिसू लागले. लायगर हा एक नवीन पॅन इंडिया चित्रपट प्रदर्शित होतोय जो हिंदीत बनविण्यात आला असून दाक्षिणात्य भाषांतही प्रदर्शित होणार आहे. महत्वाचे म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यात प्रमुख भूमिकेत असून त्याच्या नायिकेच्या भूमिकेत आहे अनन्या पांडे. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत अनन्या पांडेने वार्तालाप केला आणि त्यावेळी तिने तिच्या पहिल्या वाहिल्या पॅन इंडिया चित्रपटाविषयी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या.
अनन्या पांडे म्हणाली, “माझे वडील (अभिनेते चंकी पांडे) खूप खूष आहेत की मी लायगर हा पूर्णतः मसाला चित्रपट करीत आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच मी लायगर चा भाग झाले. माझा हा पहिला पॅन इंडिया पिक्चर आहे आणि तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतोय त्याबद्दल एक्ससाईटमेन्ट नक्कीच आहे. कम्म्युनिटी वॉचिंगचा अनुभव निराळाच असतो. हा एक पूर्णतः मसाला चित्रपट असून यातील भावनिक संघर्ष प्रेक्षकांना नक्कीच भावेल. यात भरपूर ॲक्शन असून मला जरी त्यात ती करायला मिळाली नसली तरी माझ्यामुळे ती घडते. मी शाळेत असताना तायक्वांदो शिकली होती परंतु त्यात खास प्रगती केली नव्हती. माझे कॅरॅक्टर खूप कॉन्फिडन्ट दर्शविण्यात आले असून चित्रपटात बरीच कॉमेडी पण बघायला मिळेल. मला यातील भूमिका साकारताना खूप गोष्टींवर काम करावे लागले. तसेच दिग्दर्शक पुरी यांचे व्हिजन खूप क्लियर आणि स्ट्रॉंग होते. त्यांनी जेव्हा मला स्क्रिप्ट ऐकविली तेव्हाच संपूर्ण सिनेमा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला होता. अर्थातच ही बहिर्मुख भूमिका साकारताना मला खूप मजा आली.”
अनन्या पांडे साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सोबत दिसणार असून लायगरमध्ये जागतिक ख्यातीचा मुष्टियोद्धा माईक टायसन सुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याबद्दल सांगताना अनन्या म्हणाली, “माईक टायसन हा जगप्रसिद्ध आहे आणि त्याच्यासोबत काम करायला मिळणे म्हणजे मी माझे भाग्य समजते. मी माझ्या नातवांना अभिमानाने सांगू शकेन की मी सुप्रसिद्ध माईक टायसन सोबत स्क्रीन शेयर केला होता. ही खरंतर लाइफलॉंग मेमरी आहे. विजय देवरकोंडा हा अतिशय गोड माणूस आहे. त्याचा चेहरा खूप इनोसंट आहे. लायगर मध्ये पडद्यावर तो जसा दिसतो, वागतो त्याच्या अगदी विरुद्ध स्वभाव आहे, प्रत्यक्षात. त्याने माझी खूप काळजी घेतली आणि काम करताना बरीच मदत देखील केली. तो अतिशय मृदू स्वभावाचा असून तो खूप लाजाळू देखील आहे. माझा पहिला सीन ‘रीॲक्शन’ चा होता तरीही तो फ्रेम मध्ये नसूनही, माझ्या रीॲक्शनस पर्फेक्ट याव्यात म्हणून, त्याने समोर उभे राहून संपूर्ण सीन एनॅक्ट केला. त्याच्या सोबत प्रोमोशन्स करताना वेगळाच अनुभव मिळाला. त्याने अप्रतिम काम केले असून त्याची मेहनत पडद्यावर उठून दिसते.”
अनन्याने वयाच्या १८ व्या वर्षी अभिनयक्षेत्रात करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द ईयरमधून पदार्पण केले. त्यामुळे तिला कॉलेजची मौजमस्ती करता आली नाही. त्याबद्दल विचारले असता अनन्या म्हणाली, ”मी कॉलेज लाईफ मिस करते. खूप लवकर काम सुरु केल्यामुळे आणि त्यात बिझी झाल्यामुळे मला कॉलेज लाईफ फारसे एन्जॉय करता आले नाही. माझे सर्व मित्र मैत्रिणी शिकायला बाहेरगावी होते आणि आता ते परतले आहेत. त्यांची कंप्लेंट आहे की त्यांच्यासाठी माझ्याकडे टाईम नाहीये. परंतु मी आता थोडे टाईम मॅनेजमेंट करुन ती तक्रार दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु माझा जो जीवनप्रवास आहे त्याबद्दल माझी जराही तक्रार नाही.” समकालीन हिंदी नायिकांबाबत मत नोंदवताना अनन्या म्हणाली की, “खरंतर समकालीन हिरोइन्स मध्ये आम्ही बऱ्याच जणी आहोत, उदा. सारा अली खान, जान्हवी कपूर ई. आमच्यात कॉम्पिटिशन आहे पण ती एक हेल्दी कॉम्पिटिशन आहे. माझं म्हणायचं झालं तर नवीन येणाऱ्या मुलीदेखील माझ्यासाठी कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे मी प्रत्येक भूमिकेत वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करीत असते.’
लॉकडाऊनच्या अनुभवाबद्दल सांगताना अनन्या पांडे म्हणाली, “मला खूप टेन्शन आलं होतं, कामाचं नाही तर एकंदरीत जगभरात जे चालू होतं त्याचं. मी मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. मी अचानकपणे भरपूर काम करू लागले होते आणि आयुष्यात ‘ओव्हर ड्राइव्ह मोड’ मध्ये घुसले होते. लॉकडाऊन मुळे मला आत्मसंशोधन करता आले. तसेच मी जागतिक सिनेमे पाहिले ज्यातून बरेच काही शिकायला मिळाले. महत्वाचं म्हणजे याच सुमारास मी लायगरचं शूटसुद्धा केलं.”
अनन्या ने पुढे सांगितले की ती सतत नाविन्यपूर्ण भूमिकांच्या शोधात असते आणि तिला तिच्यातील इंनोसन्स अखंडित ठेवायचा आहे. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा अभिनित ‘लायगर’ येत्या २५ ऑगस्ट ला प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - Vijay Deverkonda Interview लायगरसाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर जावे लागल्याने विजय देवराकोंडा समाधानी