मुंबई Alia bhatt : आजकाल, डीपफेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याआधीही अनेक स्टार्स याला बळी पडले आहेत. आता या यादीत आलिया भट्टचं देखील नाव जोडलं गेलंय. आलियाचा डीप-फेक एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया भट्टसारखी दिसणारी एक मुलगी स्काय कलरचा फ्लोरल को-ऑर्डर सेटमध्ये आहे. ती मुलगी कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील हावभाव करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात आलिया भट्टचा चेहरा सुपरइम्पोज करण्यात आला आहे. यावरुन सोशल मीडियावर एआयच्या वापराबाबत सध्या गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ : अनेक भारतीय सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी, रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला होता. याप्रकरणी अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. रश्मिकानं याबद्दल ट्विटरवर लिहिलं होते की, 'माझ्यासाठीच नाही तर आपल्या प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे, जे आज तंत्रज्ञानामुळे खूप नुकसानास बळी पडत आहेत. आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून मी माझं कुटुंब आणि माझं रक्षण करणाऱ्या मित्रांची ऋणी आहे. पण शाळेत किंवा कॉलेजमध्ये माझ्यासोबत हे घडलं असतं तर मी काही करू शकले नसते'.
डीपफेक व्हिडिओ व्हायरल : रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओनंतर काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. क्लिपमध्ये काजोलचा चेहरा एक महिलेला लावण्यात आला होता. या व्हिडिओत काजोल कपडे बदलताना दिसत होती. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजरचा होता. याशिवाय कतरिना कैफच्या बाबतीतही, तिच्या 'टायगर 3' चित्रपटातील फोटोसोबत छेडछाड करण्यात आली होती. तिच्या टॉवेल परिधान केलेल्या फोटोवर लो-कट पांढरा टॉप लावण्यात आला होता. तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. याशिवाय पंतप्रधान मोदी यांचा देखील एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये ते गरबा खेळताना दिसले होते. त्यानंतर त्यांनी देखील डीपफेक व्हिडिओवर चिंता व्यक्त केली होती.
हेही वाचा :