मुंबई: लोकनृत्य प्रकारात लावणीचे खूप वरचे स्थान आहे. महाराष्ट्रातील हा लोकनृत्य प्रकार देशात लोकप्रिय असून अनेक चित्रपटांमधून तो दिसत असतो. लावणीवर पोट असणारी अनेक घराणी असून ती आता लोप पावण्याच्या दशेत आहेत. परंतु बऱ्याच तरुणी हा लोकनृत्य प्रकार आपलासा करताना दिसतात, व तो जीवन तेवण्याचा प्रयत्न करतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री करिश्मा वाबळे. हल्लीच तिने लंडनमध्ये लावणी सादर केली आणि तिच्या अदाकारीवर लंडनवासी फिदा झालेले दिसत आहे.
पर्यटन विभागाने या कार्यक्रमात सहभाग: अभिनेत्री करिश्मा वाबळे हिला नुकत्याच लंडन येथे महाराष्ट्राचे लावणी नृत्य आणि सांस्कृतिक कला सादर करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन प्राधिकरणाने लंडनला पाठवले होते. महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक डॉ.भगवंतराव पाटील, एमटीडीसीच्या संचालक श्रद्धा जोशी, सहसंचालक डॉ.धनंजय सावलकर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू: या कार्यक्रमाच्या प्रवाहाचे नियोजन करण्यासाठी अभिनेता संतोष मिजगर उपस्थित होते. करिश्मा वाबळे यांनी या कार्यक्रमात लावणी, गोंधळ आणि इतर पारंपारिक लोककला सादर केल्या आहेत. संपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. लंडन आणि भारतातील लोकांना हा परफॉर्मन्स आवडला आणि करिश्माला वन्स मोअर देखील मिळाला.