मुंबई - शिवसेना भाजपची युती होणार असे दोन्ही पक्षाचे नेते ठामपणे सांगत आहेत. असे असले तरी मात्र भाजप नेत्यांच्या मनात काही तरी वेगळ चाललं आहे, हे नक्की. त्यामुळे शिवसेनेची अवस्था केवीलवाणी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या परिस्थितीत नक्की करायचे काय, असा प्रश्न सेना नेतृत्वाला पडला आहे.
असं काही ठरलंच नाही-
आमचं ठरलंय...असे युतीचे नेते सांगत आहेत. त्यानुसार सेना-भाजप समसमान जागा वाटून घेणार असल्याचा प्रस्ताव असल्याचे शिवसेनेचे नेते सांगत आहेत. शिवाय अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे वक्तव्य सेना नेते रामदास कदम यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य लागलीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावत, असं काही ठरलं नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याहून पुढे जाऊन भाजप नेते किरिट सोमय्या यांनी युती होणार पण मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार हे ठणकावून सांगितले आहे.
भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यात शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघातील नेत्यांनाच भाजपमध्ये घेण्याचा सपाटा सुरू आहे. त्यावरून शिवसेनेत अस्वस्थता आहे. तीच अस्वस्थता उद्धव ठाकरे यांनी बोलूनही दाखवली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची यादीही आता मुख्यमंत्र्यांनीच जाहीर करावी, ती घेवून मी शिवसैनिकांना देतो, असं ते म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य फार बोलके आहे. मुख्यमंत्रीही यावर लक्ष ठेवून आहेत. ते युती होणारच हे सांगताना मुख्यमंत्री कोण...कोणाला किती जागा... या बाबत मात्र काहीच बोलत नाहीत.
सध्यातरी भाजप शिवसेनेला १०० ते १२० जागा सोडण्याची तयारी दर्शवत आहे. मात्र शिवसेनेला १४४ जागा हव्या आहेत. शिवाय अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदही हवं आहे. सर्वत्र समसमान वाटप हा सेनेचा फॉर्म्यूला आहे. मात्र भाजप नेतृत्वाला ते मान्य नाही. २८८ जागा लढण्याचीच तयारी भाजपने सुरू केली आहे. याची कल्पना शिवसेना नेतृत्वाला आली आहे. त्यामुळे शिवसेनेनेही सर्वच मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहेत. शिवसेनेतील एक मोठा गट स्वबळावर लढण्याची मागणी करत आहे. मात्र, उद्धव ठाकरे अजूनही कोणत्याही निर्णयावर आलेले नाहीत.
कमी जागांवर सेनेची बोळवण होऊ शकते-
राज्यात विरोधीपक्षाची स्थिती केवीलवाणी आहे. अशात भाजपनेतृत्व शिवसेनेलाही कमजोर करण्याच्या तयारीत आहे. कमी जागांवर बोळवण करून युती करण्यास शिवसेनेला भाग पाडले जाईल, अशी शक्यता आहे. सध्याची राजकीय हवा पहाता भाजपमागे शिवसेना कशी फरफटत जाईल याची काळजी भाजप नेतृत्वाकडून पद्धतशीरपणे घेतली जात आहे. तसे झाले नाही, तर शेवटपर्यंत चर्चेत गुंतवून ठेवत ऐन वेळेला शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याची रणनीतीच भाजपने आखल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.