मुंबई - लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडल्यानंतर चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा अद्याप बाकी आहे. येत्या २९ एप्रिल रोजी मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता वाढायला लागलाय. दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी 'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर यांनी खास रोड शो केला.
आदेश बांदेकर हे सद्या शिवसेनेचे सचिव आणि राज्यमंत्री दर्जा मिळालेले सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आहेत. मात्र, तरीही होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे त्यांची घराघरात 'आदेश भाऊजी' म्हणून खास ओळख आहे. या कार्यक्रमाचे महिला वर्गात खास आकर्षण असल्याने मराठी बहुल वस्तीत आदेश यांना विशेष मागणी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आज चेंबूरमध्ये घरोघरी फिरताना राहुल शेवाळे यांनी गर्दीला आकर्षित करण्यासाठी आदेश यांची मदत घेतली.
राहुल शेवाळे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. या भागात त्यांनी चांगली कामे केली आहेत. सुशिक्षित आणि लोकांशी असलेला जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. सेना-भाजप यांच्याकडून त्यांना चांगली मदतही मिळते आहे. मात्र, तरीही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आपले म्हणणे सांगण्यासाठी आदेश बांदेकर यांच्यासारख्या सेलिब्रिटींची मदत घ्यावी लागत आहे.
खरे तर आदेश यांना कोणत्याही निवडणुकीवेळी पक्षातून मोठी मागणी असते. यापूर्वी अमरावती, शिरूर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असा मोठा दौरा करून आदेश आता मुंबईतील प्रचारात सक्रिय झाले आहेत. आता त्यांची मदत शेवाळे यांना विजयापर्यंत घेऊन जाते का, ते निकाल लागल्यावर कळेलच.