जालना - राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. यासाठी शरद पवार आज जालन्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, घनसावंगीचे आमदार राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे, अरविंद चव्हाण, बबलू चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. मला म्हातारा म्हणू नका, मी अजून म्हातारा झालेलो नाही. माझी ताकद काय आहे हे मी दाखवून देईल, असे म्हणत पवारांनी माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांची गळा भेट घेतली.
विलासराव देशमुखांचे दोन्ही चिरंजीव विधानसभेच्या आखाड्यात
भारतीय जनता पक्षावर टीका करताना पवार म्हणाले, की कर्जापायी महाराष्ट्रात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. मी मुख्यमंत्री असताना रातोरात संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत सरसकट कर्जमाफी केली असल्याची आठवण यावेळी पवारांनी करुन दिली. बँकाचे कर्ज बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालत आहे. बँका बुडू नयेत म्हणून केंद्र सरकारने 88 हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला त्यांच्याजवळ पैसा नाही. आपण सत्तेवर आल्यावर सरसकट कर्जमाफी करू याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. या सराकारच्या धोरणांमुळे उद्योग धंदे बंद पडत आहेत. नाशिकमधील 16 कारखाने बंद पडल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे आली आहे, असा आरोपही पवारांनी यावेळी केला आहे.
किल्ले पर्यटनाच्या नावाखाली सरकार बार आणि छमछम सुरू करू इच्छित आहे. आपल्या शौर्याचा जगाला परिचय करून देणाऱ्या शिवरायांच्या किल्ल्यांचा हे सरकार आपमान करीत आहे. राष्ट्रवादीतून जाणारे विकासासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगतात. मग यांनी 15 वर्ष काय केले, असा सवालही त्यांनी विचारला.
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत शरद पवारांनी उस्मानाबादपासून सभा घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत असल्याचे मुंडे म्हणाले. नांदेड, परभणी, जालना या सर्व ठिकाणी धो धो पाऊस पडत आहे. त्यात ही पवारांची चिकाटी पाहिल्यास देव माणूस काय असतो ते कळते, असे म्हणत शरद पवारांची त्यांनी स्तुती केली. अशा देव माणसाच्या आपण पाठीशी उभे राहीले पाहिजे. त्यांच्या संघर्षाला नियतीचा आशीर्वाद आहे. आत्तापर्यंत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली ते राजे, सरदार, सेनापती, कावळे गेले तरी राष्ट्रवादी काँग्रेस संपणार नाही. मात्र, आज कुणीही साहेबांवर टीका करतो हे खपवून घेऊ नका, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
आमदार राजेश टोपे यांनी देखील यावेळी शरद पवार यांचा जाणता राजा म्हणून उल्लेख केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याची धमक फक्त पवारांत आहे, असेही ते म्हणाले. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. मी पक्षांतर करणार असल्याच्या फक्त अफवा आहेत. आपण पक्षासोबत एकनिष्ठ रहाणार असल्याचा पुनरुच्चारही टोपे यांनी केला आहे.