सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला तर हिंसा होईल असे भाष्य एका कार्यकर्त्याकडून करण्यात आले होते. त्यानंतर वंचित आणि आंबेडकरी समाजामध्ये यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला शांततेते आवाहन केले आहे.
फेसबुकवर प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट करुन जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले. या व्हिडिओत आंबेडकर म्हणतात, ''सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या संदर्भात, भीम आर्मीचे कांबळे यांनी आदेश काढलेत की, सोलापूरमधील निकाल जर विरोधी लागला तर बीजेपीची सर्व ऑफिसेस तोडली जातील. माझं वंचित समुहाला, त्याचबरोबर आंबेडकरी समुहाला हे आवाहन आहे, की जो काही निकाल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. कुठल्याही पध्दतीने दंगल होणार नाही, शांतता भंग होणार नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचे ऑफिस तोडले जाणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. एवढी माझी आपल्या सर्वांना विनंती.''
या आवाहनाला प्रतिसाद बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते आणि आंबेडकरी प्रेमी जनता देईल अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.