अहमदनगर - सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज नरेंद्र मोदी यांच्या सभेचे अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली. अहमदनगर दक्षिणमधून गांधी यांना उमेदवारी नाकारून सुजय विखे यांना देण्यात आली आहे. यामुळे त्यांची ही नाराजी समोर आली असल्याचे बोलले जात आहे.
नगर दक्षीणचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आज शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी खासदार दिलीप गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा सांगितला. मात्र, तेवढ्यातच भाजपचे जिल्हाध्यक्ष भानदास बेरड यांनी त्यांना भाषण आवरते घेण्यासाठी चिठ्ठीद्वारे सांगितले. मात्र, हीच बाब त्यांना खटकली आणि त्यांनी थेट भाषण थांबवण्याचा पवित्रा घेतला. मात्र, यानंतर त्यांना भाषण पुढे सुरू ठेवण्यास सांगितले. यावर, मतदारसंघात काम केले नाही, अशी ओरड होते. त्यामुळे मी काय काम केले, हे सांगणे गरजेचे आहे. मला बोलण्यासाठी वेळ नसेल, तर मी थांबतो, असे म्हणत खासदार गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.
एकूणच खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारल्याने खासदार गांधी यांची नाराजी डॉ. सुजय विखे यांना अडचणीची ठरू शकते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.