जळगाव - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी सहा वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल प्रक्रिया घेण्यात आल्यानंतर सात वाजेपासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी उन्ह कमी असल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची सकाळी मतदान केंद्रावर उत्स्फूर्तपणे गर्दी दिसून येत आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात 14 तर, रावेर लोकसभा मतदार संघात 12 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात एकूण 34 लाख 31 हजार 485 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जळगाव आणि रावेर मतदारसंघात 3 हजार 617 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 26 हजार 136 अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामी नेमणूक करण्यात आली आहे.
भाजपचे हेविवेट नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसे तर काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील रिंगणात आहेत. ही निवडणूक एकनाथ खडसेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.