भंडारा - यूपीएचे सरकार सत्तेत आल्यास सर्वात पहिले देशातल्या दोन दाढीवाल्या बुवांना जेलमध्ये घालू, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी आले असता ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना उद्देशून बोलत होते.
भाषणाच्या सुरुवातीपासूनच मुंडे आक्रमक होते. भाजप सरकार खोटारडे आहे. जे मोदी २०१४ च्या निवडणूकीवेळी 'बहुत हो गई महंगाई की मार, आबकी बार मोदी सरकार' असे म्हणत होते. त्या मोदींना आता महागाई दिसत नाही का? असा सवाल मुंडेंनी यावेळी केला. २०१४ च्या तुलनेत आज प्रत्येक गोष्टीचे दर वाढले आहे. सिलेंडर,वीज, पेट्रोल यांचे दर दुपटीने वाढली आहे. मात्र याविषयी नरेंद्र मोदी आपल्या कोणत्याही भाषणात बोलत नाहीत. महागाईच्या नावाखाली सत्तेवर येऊन पाच वर्षे त्यांनी लोकांना लुटले आहे.
पंतप्रधान होण्याआधी २ कोटी तरुणांना रोजगार देऊ, अशी घोषणा मोदींनी केली होती. त्यामुळे तरुण खुश होता. नोकरी मिळाली, की छोकरी मिळेल आणि छोकरी मिळाली, की हम दो हमारे दो, असा सुखी संसार सुरू राहील, असे या तरुणांना वाटले आणि त्यामुळे २०१४ च्या निवडणूकीत तरुणही अबकी बार मोदी सरकार म्हणून ओरडत होते. मात्र या तरुणांना आता विचारल्यास स्वतः तरुण विचारतात कुठे आहेत आमच्या नोकऱ्या? त्यामुळे आता देशातील तरुणच भाजप सरकारला धडा शिकवेल. विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. पंतप्रधान या ठिकाणी येवून ३ सभा घेतात. पण एकाही सभेत दुप्पट हमीभाव देऊ या घोषणेबद्दल बोलत नाहीत.
विदर्भात येऊन मोदींनी मागील पाच वर्षात काय विकासाची कामे केली हे सांगितलेच नाही. कारण त्यांनी विकासाची कामे केलीच नाही. वर्ध्यात येऊन शरद पवार यांच्या कुटुंबावर भाष्य केले. मोदींनी शरद पवार सारख्या मोठ्या माणसावर, असे वैयक्तिक टीका करायला नको होती. तुम्ही आमच्या नेत्यावर टीका करणार असाल तर आम्हीही करू. पवार साहेब आम्हा सर्व कुटुंबीयातील लोकांचा सांभाळ करतात. मात्र, तुमचं कुटुंब कुठे आहे? तुम्ही का बरं तुमच्या पत्नीला सोडलं, अशी खोचक टीका मुंडे यांनी यावेळी केली.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बघितलं की अनिल कपूरच्या नायक चित्रपटाची आठवणं होते. या चित्रपटात अमरीश पुरी आणि त्याच्या पी. ए. ची जी अवस्था झाली ती अवस्था निवडणूकांच्या निकालानंतर मोदी आणि शहाची होईल. मोदी आपल्या भाषणात जीएसटी, मेकिंग इंडिया, स्टार्टअप इंडिया, नोट बंदी या विषयी बोलत नाही. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही नक्की जिंकणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.