हिंगोली - लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णत: सज्ज झाले आहे. आज नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते ईव्हीएम सुपूर्द करण्यात आले. यावेळी निवडणूक विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, एकुण कर्मचाऱ्यांचा अंदाज न आल्यामुळे त्यांना भोजन अपूरे पडले. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी अर्ध्यावरच जेवण आटोपले.
हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी ६ विधानसभा मतदारसंघात १ हजार ९९७ मतदान केंद्रावरून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ८ हजार ८८९ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, ९०१ कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. आज या सर्व कर्मचाऱ्यांना हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या तंत्र निकेतन महाविद्यालयात मतदान यंत्र हाताळण्याचे शेवटचे प्रशिक्षण दिले. तर निवडणुकीसाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. भोजनात भात, पोळी, सोयाबीन वडी, वरण आणि शिरा या पदार्थांचा समावेश होता. मात्र, वरण जास्त प्रमाणात तेलकट आणि तिखट झाल्याने कर्मचाऱ्यांनी अर्ध्यावरच जेवण आटोपले. स्वयंपाकही अपुरा पडल्याने या ठिकाणी एकच घाई झाली होती. त्यानंतर पुन्हा स्वयंपाक करण्यात आला. मात्र, तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी मतदान पेट्या घेत काढता पाय घेतला.
जे कर्मचारी रात्रंदिवस लोकशाहीच्या उत्सवात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्याना जर अर्ध्यापोटी मतदान केंद्रावर जाण्याची वेळ येत असेल तर, याहून दुर्देवाची बाब कोणती. तरीही प्रशासन गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगत आहे. तरीही ही तयारी कमी पडल्याचे यावेळी दिसुन आले.
वसमत मतदार संघातील खुद्द वसमत येथील महात्मा गांधी विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर लाईट्स, सतरंज्या, टेबल आदींची व्यवस्था केली नसल्यानेही कर्मचारी चांगलेच भांबावून गेलेले आहेत. याबाबत त्यांनी वरिष्ठांशीदेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशीरापर्यंत काहीही व्यवस्था झाली नव्हती.
या मतदान केंद्रावरून १ हजार ३१ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोग महिला मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवित आहे. मात्र, इकडे निवडणूक कर्मचऱ्यांवर रात्र अंधारात काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे.