सोलापूर - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपायला एक दिवस बाकी असताना अचानक धनगर आरक्षण कृती समितीने सुशिलकुमार शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तातडीची बैठक बोलावून कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ठराव जाहीर केला. धनगर समाजाचे प्रश्न संसदेत मांडण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने धनगर समाजाला आपल्या बाजूला वळविले होते. त्यासाठी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटीचे आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या सभेत दिले होते. पण ५ वर्षे उलटली तरी ते आश्वासन पाळले नाही. म्हणून धनगर समाज सत्तेत आणू शकतो तसे तो सत्तेवरून खालीही खेचू शकतो, हा इशारा देत आज धनगर समाज नेत्यांनी काँग्रेसच्या शिंदेंना जाहीर पाठिंबा दिला.
या मेळाव्यात उपस्थित असलेल्या धनगर समाजांच्या नेत्यांचे प्राबल्य मोठे आहे. ते गावगुंडीतील राजकारण करणारे आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर जाहीरपणाने दिलेला हा पाठिंबा काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी फायद्याचा ठरु शकतो, असे बोलले जात आहे.