सोलापूर - काल माढा मतदारसंघातील मतदान पार पडले. अनेक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी दोन नवरदेव शहरवासियांचे मुख्य आकर्षण ठरले. अभय आणि अक्षय चवरे या दोघा भावांनी आपल्या लग्नाआधी मतदान करायचे ठरवले. मतदान करण्यासाठी ते घोड्यावरुन मतदान केंद्रापर्यंत पोहोचले. हातामध्ये फलक धरुन त्यांनी मतदान जागृती देखील केली.
माढा शहरातील शिवाजीनगर भागात राहत असलेल्या अभय विलास चवरे व अक्षय विलास चवरे या दोघा भावंडांचे शहरातील श्री तुळजाभवानी मंगल कार्यालयात २३ एप्रिलला लग्न होते. याच दिवशी मतदान होते. लग्नाच्या धामधुमीमुळे कदाचित मतदान करण्यास वेळ मिळणे शक्य झाले नसते. पण, चवरे बंधुंनी मतदानाला लग्ना इतकेच महत्व दिले. ज्या घोड्यावरुन लग्नाची मिरवणूक निघते त्याचा घोड्यावर बसून ते मतदान केंद्रापर्यंत गेले.
या दोघा भावंडांनी मंगल कार्यालयापासून १ किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. दोघांनीही घोड्यावरच येऊन मतदानाचा हक्क बजावला. अन् परत ते बोहलल्यावर चढले. मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून साजरा करणाऱ्यांना या दोघा नवरदेवांनी चांगला संदेश दिला आहे. या दोघांच्या कृतीची चर्चा माढा शहरासह तालुक्यात झाली. सोशल माध्यमावर ही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.