कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असले तरी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात कोण निवडून येईल हे कोणीच ठाम सांगू शकत नाही. दोन्ही मतदारसंघात रंगतदार लढत पाहायला मिळाली. मात्र, गावोवावी कट्यावरील चर्चा रंगतदार बनत चालल्या आहेत. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपला उमेदवार कसा निवडून येईल याबाबत गणिते मांडून पैजा लावत आहेत. असेच प्रकार इचलकरंजी आणि राधानगरीमध्ये पाहायला मिळाले.
इचलकरंजीचे अरविंद बंडू खोत यांनी शिवसेना-भाजप मित्रपक्षाचे उमेदवार धैर्यशील माने विजयी होणार म्हणून, तर गोमटेश सुकुमार पाटील यांनी महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी विजयी होणार म्हणून, प्रत्येकी १ लाख रुपयाची पैज लावलेली आहे. या दोघांची रक्कम त्यांचे मध्यस्थी गिरीश विजयकुमार शेटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
राधानगरीमध्ये अभिजीत सरावणे यांनी शिवसेना-भाजप मित्रपक्षाचे उमेदवार संजय मंडलिक विजयी होणार म्हणून तर नारायण निउंगरे यांनी महाआघाडी-काँग्रेस स्वाभिमानीचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी होणार म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपयांची पैज लावली आहे. दोघांचीही पैजेची १ लाख रुपये रक्कम राधानगरीचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश नामदेव बालनकर यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने उभे आहेत. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. दोन्हीही मतदारसंघातील यंदाची निवडणूक टोकाची झाल्याने कार्यकर्त्यांच्यातही असलेली टोकाची ईर्ष्या अनेक पैजेच्या माध्यमातून कोल्हापुरात पाहायला मिळत आहे.