नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचा जन्म काँगेसच्या भ्रष्ट्राचाराविरोधात झाला होता. मात्र, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची जोडी लोकशाहीसाठी धोकादायक होत चालली असल्याने काँग्रेसशी आघाडी करण्याचा विचार आप पक्ष करत असल्याचे आप नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले. ते आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. सिसोदिया यांनी त्यांचे अगोदरचेच वक्तव्य पुन्हा बोलून दाखवले.
सिसोदिया म्हणाले, हरियाणामध्ये काँग्रेसचा सर्व जागांवर पराभव होण्याची शक्यता आहे. आघाडी झाली तर ते १० जागांवर भाजपचा पराभव करु शकतात. यासाठी आम्ही जेजेपी आप आणि काँग्रेसच्या आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसकडे पाठवला होता. हरियाणामध्ये आम्ही ६:३:१ च्या फॉर्म्युल्यावर आघाडी करण्यास तयार होतो. मात्र, काँग्रेसने तो प्रस्ताव नाकारला. पुन्हा आम्ही जेजेपीशी चर्चा करून काँग्रेससमोर ७:२:१ चा फॉर्म्युला ठेवला, ज्यावर जेजेपीसुद्धा तयार होती. मात्र, काँग्रेसने हा प्रस्तावही नाकारत काल रात्री हरियाणा आणि चंदीगडमध्ये आम्ही आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले.
संजय सिंह म्हणाले की, या १८ जागांवर आघाडी झाल्यास भाजप सत्तेत येऊ शकत नाही. पंजाबमध्ये आमचे २० आमदार आणि ४ खासदार आहेत, मात्र तेथेही काँग्रेस आघाडी करण्यास तयार झाली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी पुन्हा सत्तेत आल्यास त्याला काँग्रेसचे सर्वस्वी जबाबदार असेल.
हरियाणा आणि चंडीगडमध्ये काँग्रेस आघाडीसाठी तयार होत नसल्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत भर दिला. मात्र, दिल्लीत आघाडी होणार कि, नाही याविषयी स्पष्ट माहिती दिली नाही. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी फक्त दिल्ली विषयी 'नाही' असे म्हटले आहे. तरी अजूनही आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रकार परिषदेतून पुन्हा काही ठोस माहिती मिळू शकली नाही.