मुंबई : मुंबई शहर हे महिलांसाठी सर्वात अधिक सुरक्षित समजले जाते. मात्र, त्याच मुंबईमध्ये महिला असुरक्षित असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये दिवसाला तीन महिलांवर लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडत असल्याची बाब आकडेवारीनुसार समोर आली आहे. मुंबईमध्ये सहा महिन्यांत 494 महिलांवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई पोलिसांकडून 6 महिन्यातील गुन्हेगारीसंदर्भात आकडेवारी जाहीर : मुंबई पोलिसांकडून गुन्हेगारीसंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये महिला असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जानेवारी ते जूनपर्यंत मुंबईत दररोज सरासरी 3 महिलांवर बलात्कार झाला आहे. सहा महिन्यांत महिलांवरील बलात्काराचे 494 गुन्हे दाखल झाले आहेत.
बलात्काराच्या घटनांमध्ये 84 टक्के गुन्ह्यांची उकल : बलात्काराच्या घटनांमध्ये तपासाचे प्रमाण पाहता काहीसा दिलासा मिळतो. जानेवारी ते जून या कालावधीत नोंदवलेल्या महिलांवरील बलात्काराच्या 84 टक्के गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केल्याचे अहवालात म्हटले आहे. हे यश 2021 च्या तुलनेत 19 टक्क्यांनी जास्त आहे. कारण गेल्या वर्षी पोलिसांनी केवळ 78 टक्के प्रकरणांची उकल केली होती. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या मासिक गुन्हे अहवालात ही बाब समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या अहवालानुसार गेल्या महिन्यांत म्हणजेच जून महिन्यात महिलांवर बलात्काराच्या 73 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. मे महिन्यात हा आकडा 95 होता. ज्यामध्ये किरकोळ प्रकरणे 52 आणि मोठी प्रकरणे 43 आहेत.
मुंबईत 6 महिन्यांत 494 बलात्काराचे गुन्हे : मुंबईत जूनमध्ये दररोज 2 महिलांवर बलात्कार झाले, तर मे महिन्यात दररोज 3 महिलांवर बलात्कार झाले. जून आणि मे महिन्यात म्हणजे गेल्या 61 दिवसांत 168 महिलांवर बलात्कार झाला असल्याचे निष्पन्न झाले. अशाप्रकारे या काळात मुंबईत सरासरी 3 महिलांवर बलात्कार झाले आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत.
सरासरीनुसार गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी अधिक बलात्काराचे गुन्हे : गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारी ते जूनपर्यंत म्हणजेच गेल्या 183 दिवसांत महिलांवरील बलात्काराचे 494 गुन्हे दाखल झाले आहेत. दररोज सरासरी 2 ते 3 महिलांनी पोलिस ठाण्यात बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याच वेळी 2021 मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत बलात्काराचे 475 गुन्हे दाखल झाले आहेत.
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे पोलिसांवर खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं होतं. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.