शिर्डी ( अहमदनगर ) : मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Minister Shankarrao Gadakh ) यांचे स्वीय सहाय्यक राहुल जनार्दन राजळे यांच्यावर घोडेगाव-लोहगाव रस्त्यावर मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून पाच गोळ्या ( Firing On Ministers PA ) झाडल्या. कमरेच्या खाली दोन गोळ्या लागल्याने त्यांचा प्राण वाचला ( Rahul Rajale Injured In Firing ) आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल : काल शुक्रवारी रात्री 9.45 वाजता राजळे आपल्या घरी लोहगाव येथे जात असताना पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपीने गोळीबार करुन हत्येचा प्रयत्न केला. याबाबत राहुल यांचे बंधू विकास यांनी फिर्याद दिल्यानुसार नितीन शिरसाठ (रा. वांजोळी), बबलू लोंढे, संतोष भिंगारदिवे (रा.घोडेगाव), ऋषिकेश वसंत शेटे (रा.सोनई) व अन्य दोन ते तीन जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रभर केली नाकेबंदी : सोनई येथील ऋषिकेश शेटे याच्या सांगण्यावरून आरोपींनी बंधू राहुलवर खुनी हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी भेट देवून सोनई पोलिसांना तपासाबाबत सुचना केली. घटनेनंतर पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, रामचंद्र कर्पे व पथकाने नगर-औरंगाबाद रस्त्यासह सर्व रस्त्यावर रात्रभर नाकेबंदी केली होती.
आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना : आज शनिवारी दिवसभर पोलिस आरोपीच्या शोधात आहेत.जखमी राजळे यांना रात्रीच नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.रात्री साडेबारा वाजता शस्त्रक्रिया करुन मांडीतील एक गोळी काढण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे सोनईत तळ ठोकून असुन आरोपीच्या शोधात पथक तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा : निर्दयी! पतीने केली पत्नी आणि मुलाची हत्या; मेहुण्याला व्हिडीओ कॉल करून म्हणाला...