पंढरपूर - मंगळवेढा सब जेलमधील अंधाराचा फायदा घेऊन सब जेलच्या पाठीमागे खुनातील आरोपींने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या दोन तासांमध्येच मंगळवेढा पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतने फिरवत पळून गेलेल्या आरोपीला जेरबंद केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ रोडवर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी आनंदा तुकाराम होनमुर्गी (रा. मारोळी) याला अवघ्या दोन तासात पोलिसांनी अटक केली.
अंधाराचा फायदा घेत आरोपीचे पलायन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जूनच्या रात्री मंगळवेढा शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस चालू झाल्यामुळे मंगळवेढा सब जेलमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे सर्व कैद्यांना सब जेलच्या प्रांगणात सोडण्यात आले होते. याचाच फायदा घेत खुनातील आरोपी असणाऱ्या आनंदा तुकाराम होनमुर्गी याने अंधाराचा फायदा घेत सब जेलच्या मागील बाजूस संरक्षण भिंतीवरील तारेचे कुंपणचा आधार घेऊन जेलमधील भिंतीवरून उडी घेत मारोळी या गावाच्या दिशेने पळून गेला.
मंगळवेढा पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या
मंगळवेढा शहरातील पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सर्व आरोपींना पूर्ववत जेलमध्ये पाठवत असताना त्यामध्ये एक आरोपी कमी आढळून आला होता. त्याबाबत तात्काळ मंगळवेढा पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना माहिती देण्यात आली. गुंजवटे यांनी आरोपीचा शोधण्यासाठी पोलिसांचे सहा पथके तयार करण्यात आली. शहरातील खोमनाळ रोड येथील रात्री दहा वाजता संबंधित कैदी चालत चालल्याचे दिसून आले. मंगळवेढा पोलीस पथकाने अवघ्या दोन तासात पलायन केलेल्या आरोपीचा शोध घेत मुसक्या आवळल्या आहेत. सदर पथकाने तत्काळ आनंदा होनमुर्गी याला जागीच अटक करत सब जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे.