देवघर (झारखंड) : झारखंडच्या देवघर येथे मासळी व्यावसायिकाच्या सुरक्षेत गुंतलेल्या दोन पोलिसांवर गुन्हेगारांनी गोळी झाडली असून, त्यात दोन्ही जवान शहीद झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री 12.30 च्या सुमारास नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्यामगंज रोड आंदा पट्टी येथे घडल्याची माहिती आहे.
गुन्हेगारांना प्रत्युत्तर दिले : देवघर येथील मासे व्यावसायिक सुधाकर झा यांच्यावर काल रात्री गुन्हेगारांनी हल्ला केला. शस्त्रधारी गुन्हेगारांनी त्यांना लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्याला सुधाकर झा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सरकारी अंगरक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या या दोन जिल्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांना गोळ्या घातल्या. मात्र या चकमकीत हे दोन्ही पोलीस शहीद झाले.
शहीद जवान साहिबगंजचे रहिवासी : देवघरमधील चकमकीच्या या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. रात्री उशिरा घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुभाषचंद्र जाट यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. याशिवाय उर्वरित पोलिसांशी बोलून त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. या चकमकीत गुन्हेगारांनी गोळ्या झाडलेल्या दोन्ही जवानांचा जागीच मृत्यू झाल्याचे एसपींनी ईटीव्ही भारतला फोनवरून सांगितले. संतोष यादव आणि रवी मिश्रा अशी त्यांची नावे असून दोघेही साहिबगंजचे रहिवासी आहेत.
यापूर्वीही झाला होता हल्ला : या हल्ल्यात व्यापारी सुधाकर झा बचावले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी काही लोकांना पकडले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सुधाकर झा यांच्यावर हल्ला का झाला हे आत्ताच सांगता येणार नाही. या हल्यामागचे कारण खंडणी व वर्चस्वासाठीचे भांडण असल्याचे सांगितले जात आहे. मासे व्यावसायिक सुधाकर झा यांच्यावर यापूर्वीही हल्लेखोरांनी हल्ला केला होता. यासाठी त्यांना दोन सरकारी अंगरक्षक देण्यात आले होते. मात्र यावेळी त्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या जवानांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
भाजप नेत्याची नक्षलवाद्यांकडून हत्या : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सागर साहू यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. पाच दिवसांपूर्वी विजापूरमध्येही नक्षलवाद्यांनी भाजपच्या एका नेत्याची हत्या केली होती. आठवडाभरात नक्षलवाद्यांकडून हत्येची ही दुसरी घटना आहे. एकामागून एक होत असलेल्या हत्यांवरून भारतीय जनता पक्षाने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.