सोलापूर : शहरातील चोरी झालेल्या घरात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्यास अटक करून त्याकडून सर्व मुद्देमाल जप्त केला. शहर पोलीस दलातील क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कसोशीने या चोरीचा तपास करून, ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या उमाकांत उर्फ उमेश बाबू यादव (वय. 30 वर्षे, रा. सुलेरजवळगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यास अटक केली. घरी काम करीत असलेल्या ड्रायव्हरवर आशिष पाटोदेकर व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी मोठा विश्वास केला होता. उमाकांत उर्फ उमेश याने विश्वासघात करीत 45 लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा मुद्देमाल बनावट चावीने लंपास केला होता.
मालकाला धडा शिकवण्यासाठी केली चोरी : मालक नेहमी घालून पाडून बोलत असे, त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या घरी चोरी केली असल्याची माहिती संशयित चोरट्याने पोलिसांना दिली. डीसीपी दीपाली काळे यांनी अधिकृत माहिती देत शंभर टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती दिली. उमाकांत उर्फ उमेश हा ड्रायव्हर म्हणून कामास होता. आशिष पाटोदेकर यांचा कापसाच्या बियांपासून तेल काढण्याचा मोठा व्यवसाय आहे. सोलापूर जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात आशिष यांचे प्लांट सुरू आहेत.
कुटुंबातील सदस्यांचा ड्रायव्हरवर होता विश्वास : त्यांच्याजवळ जवळपास 15 चारचाकी वाहने आहेत. या वाहनावर उमाकांत उर्फ उमेश यादव हा गेल्या अडीच वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होता. ड्रायव्हर उमाकांतचे नेहमी मालकासोबत खटके उडत होते. उमाकांत हा अडीच वर्षांपासून काम करीत असल्याने त्यावर मोठा विश्वास केला होता. आशीष पाटोदेकर या व्यवसायिकाच्या घरातील महिलांनीदेखील मोठा विश्वास केला होता. तो घरातील भाजी आणून देत होता. घरातील लहान मुलांना शाळेत ने-आण करीत होता.
पंधरा दिवसांपूर्वी ड्रायव्हरने काम सोडले : ड्रायव्हर म्हणून काम करत असताना, उमाकांतचे नेहमीच मालकासोबत खटके उडत होते. पंधरा दिवसांपूर्वी वाद करून काम सोडले होते. आशिष पाटोदेकर हे कामानिमित्त संपूर्ण कुटुंबासह पुण्याला गेले होते. 1 फेब्रुवारी रोजी आशिष पाटोदेकर यांच्या घरातील 45 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाले असल्याचे लक्षात आल्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली होती. मोठी घरफोडी असल्याने क्राईम ब्रँचने तपास सुरू केला. पंधरा दिवसांपूर्वी सोडलेल्या ड्रायव्हरचे बिंग फुटले.
धडा शिकवण्यासाठी मालकाचे घर फोडले : ड्रायव्हर म्हणून काम करताना उमाकांत उर्फ उमेश वर मोठा विश्वास ठेवला होता. घरातील बेडरूमच्या चाव्या देखील त्याकडे होत्या. काम सोडण्याअगोदर त्याने सर्व चाव्यांचे डुप्लिकेट चाव्या तयार करून घेतल्या होत्या. मालकाने अनेकदा घालून पाडून बोलले होते. त्याचा राग ड्रायव्हरच्या मनात होता. 1 फेब्रुवारी रोजी घरी कोणी नसल्याची संधी साधून उमाकांत यादव याने, डुप्लिकेट चाव्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटमधील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. मालक आशिष पाटोदेकर व इतरांनी मला खूप त्रास दिला. त्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे म्हणून चोरी केली असल्याची कबुली उमाकांतने पोलिसांना दिली.
ड्रायव्हर उमाकांतचे असे फुटले बिंग : सोलापूर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सूक्ष्म अभ्यास करीत तपासाला सुरुवात केली. घरातील कोणतेही कुलूप तुटले नव्हते, याचे निष्कर्ष असे काढले होते. बनावट चावीने दरवाजे आणि कपाट उघडले आहे. त्यानंतर उमाकांतने पंधरा दिवसांपूर्वी काम सोडले होते, त्याच मोबाईल लोकेशन काढले असता, चोरी झाल्याच्या रात्री तो घटनास्थळी होता. क्राईम ब्रँचचे एपीआय संजय क्षीरसागर यांनी उमाकांत यादव याची संपूर्ण माहिती काढली असता तो पुण्यातील एका लॉजमध्ये राहत आहे. पुणे-सातारा रोडवरील एका लॉजमध्ये उमाकांत यादव पोलिसांना सापडला. त्याची सर्व झडती घेतली असता, त्याकडे 45 लाख रुपयांची रोखड व दागिने सापडले. क्राईम ब्रँचच्या डीसीपी यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की, सोलापुरात झालेच्या चोरीचा छडा लागला आहे. सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.