ठाणे - भिवंडी माझ्या बापाची आहे, असे बोलण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला. या वादातून एका तरुणाची पेट्रोल पंपावरच टवाळखोरांनी धुलाई केली आहे. विशेष म्हणजे तरुणाच्या धुलाईचा थरार पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अन् प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. ही घटना भिवंडी शहरातील बागे फिरदोस रोडवरील पेट्रोल पंपावर घडली आहे.
दुचाकी विरुद्ध दिशेने आल्याने झाला राडा
तीन दिवसापूर्वी म्हणजे २७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास भिवंडी शहरातील बागे फिरदोस रोडवरील पेट्रोल पंपावर वाहनचालक वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी येत जात होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने आल्याने त्याला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वराने विरुद्ध दिशेने का आलास याचा जाब विचारला. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची होऊन वाद झाला. वाद सुरू असतानाच 'भिवंडी मेरे बाप की है' असे बोलताच दोघांमध्ये अधिकच वाद वाढला. त्यातच समोरील अनोखळी दुचाकीस्वाराने आपल्या साथीदारांना बोलावून वाद घालणाऱ्या दुचाकीवरील केतनकुमार पटेल या तरुणाला बेदम मारहाण केली.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पंपावरील कर्मचारी मारहाण थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र मारहाण करून राडेबाज टोळके घटनास्थळावरून पसार झाले. तर पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या संपूर्ण राड्याची घटना कैद झाली आहे. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात मारहाणीत जखमी झालेल्या केतनकुमार पटेल यांनी मारहाण करणाऱ्या ५ ते ६ तरुणांविरोधात तक्रार दाखल केली असून पुढली तपास पोलीस करीत आहे.