ठाणे - गणपती विसर्जनादिवशी शेकडो टन निर्माल्य तयार होत असते. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे ही दरवर्षीची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. हे निर्माल्य पाण्यात टाकले तर पाणी प्रदूषित होते. यामुळे ठाण्यातील विवियाना मॉलने एक नामी शक्कल लढवली आहे. लोकांनी आपल्याकडे निर्माल्य घेऊन यावे, यासाठी त्यांनी "निर्माल्य द्या, नैसर्गिक खत घ्या " ही योजना सुरू केली आहे.
हेही वाचा - कृत्रिम तलावाचा वापर करा; परळ गाव गणेश मंडळाचे भक्तांना आवाहन
विवियाना मॉलच्या या योजनेला ठाणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा झाले आहे. निर्माल्य देणाऱ्यांना एक कूपन देण्यात येते. या कूपनच्या बदल्यात 20 दिवसांनी खत मिळते. ही एक अत्यंत अभिनव कल्पना असून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा होत आहे. या निर्माल्यातून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खत निर्मिती करून ती परत लोकांना देण्यात येत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे तलाव, नद्या, खाड्या आणि समुद्रातील प्रदूषण कमी होईल आणि लोकांना फुकटात नैसर्गिक खत मिळेल, असे मॉलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.