ठाणे - दोन कुटुंबामधील क्षुल्लक भांडणात उद्भवलेल्या हाणामारीच्या प्रसंगाला मराठी विरुद्ध गुजराती अशा वादाचे स्वरूप देत व्हायरल केलेल्या व्हिडिओने ठाण्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार नौपाड्यातील विष्णूनगर परिसरात 11 सप्टेंबरला घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी अदखलपात्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही कुटुंबाना नोटीस बजावली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, असा कुठलाही जातीय वाद उद्भवला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले दोन समाजात दुही निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
नौपाड्यातील विष्णूनगर हा मराठी भाषिक ब्राह्मणबहुल परिसर आहे. येथील सुयश सोसायटीत पाचव्या मजल्यावर राहुल पैठणकर हे मराठी भाषिक आणि सहाव्या मजल्यावर हसमुख शाह हे गुजराती भाषिक कुटुंबासह वास्तव्य करतात. 11 सप्टेंबरला राहुल यांच्या आईची चप्पल लिफ्टमध्ये अडकल्याने लिफ्ट अडकली होती. तेव्हा, वरच्या मजल्यावरील शहा कुटुंबीयांनी याबाबतची विचारपूस राहुल यांच्याशी केली असता दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादाचे पर्यवसन वाद व शिवीगाळात झाले. यावेळी दोन्ही कुटुंबाकडून एकमेकांस हाणामारी करण्यापर्यंत मजल गेली. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची उणीदुणी काढली. शहा पिता-पुत्रांनी राहुल यांना मारहाण केल्याची सीसीटीव्ही चित्रफीत सोशल मीडियात व्हायरल करून काही जणांनी या वादाला मराठी विरुद्ध गुजराती भाषिक वादाची फोडणी दिली.
हेही वाचा - डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; एकजण बचावला
या व्हायरल चित्रफितीमुळे ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले. दोन्ही कुटुंबातील हा वाद नौपाडा पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनीही दोघांच्या तक्रारी नोंदवून घेत दोन्ही कुटुंबाना नोटीस बजावली असून या वादावर पडला आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या चित्रीकरणाने पोलिसांचा नाहक ताप वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.