ठाणे - जवळपास तीन महिन्यांनी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे हे दोघेही पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून आयुक्तांनी सभागृहात सादर केलेल्या निवेदनावर मीनाक्षी शिंदे यांनी आक्षेप घेत, केवळ तांत्रिक गोष्टींवर चर्चा करण्यात येत असल्याचा आरोप केल. तसेच शहरातील सद्य परिस्थितीमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याचे सांगून प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचा टोला त्यांनी आयुक्तांना लगावला आहे.
यावर प्रत्युत्तर देताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक गोष्टी सादर केल्याचा खुलासा आयुक्तांनी केला. तसेच सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या कामांवरच बोलण्याचा आग्रह त्यांनी केल्यानंतर महापौर आणि आयुक्तांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे.
हेही वाचा - इमारतीच्या सर्व्हिस लिफ्टमध्ये चिरडून मजूर ठार
पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत. एकतर्फी कारभार तसेच नगरसेवकांना गृहीत धरत असल्याचे आरोप जयस्वाल यांवर अनेकदा झाले आहेत. यामुळे महापौर गेल्या काही महिन्यांपासून आयुक्तांच्या कारभारावर संतप्त आहेत.
मध्यंतरी या वादावर राजकीय हस्तक्षेपाने पडदा पडल्याने वातावरण शांत होते. मात्र, सोमवारी(दि.11 नोव्हेंबर)ला झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा हा वाद विकोपाला गेला.
शहरातील पाण्याचा प्रश्न व प्रशासनाच्या वितरण व्यवस्थेचे बिघडलेले समीकरण यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी खुद्द पालिका आयुक्तांनी शहारत सुरू असलेल्या सर्व योजनांची माहिती सादर केली. येत्या दोन ते अडीच वर्षात शहरातील पाण्याचा प्रश्न या योजांनमुळे सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा खेळणी विकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, शोध सुरू
मात्र, आयुक्तांच्या निवदेनावर आक्षेप घेत प्रशासनाची कृती शून्य असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला. तसेच प्रभागांमधील परिस्थिती नगरसेवकांकडून जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगत आयुक्तांच्या मुद्द्यांना बगल देण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याने वादाला तोंड फुटले.