नवी मुंबई - रेल्वेच्या जमिनींवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी मध्य हार्बर रेल्वेने आपल्या हद्दीतील जागा भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली. मात्र, नवी मुंबईतील या भाज्या दूषित व रसायन मिश्रीत पाण्यावर पिकवल्या जात आहेत. या भाज्या नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असूनही या भाज्या स्टेशन परिसरात विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत.
नवी मुंबईत रेल्वेच्या कित्येक मोकळ्या जागा आहेत. या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून मोकळ्या जागेत भाजीपाला पिकवला जात आहे. प्रदूषित पाण्यापासून पिकवली जाणारी शेती लोकांच्या आरोग्याला धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गाशेजारी गटाराच्या पाण्यावर पिकवल्या जाणाऱ्या भाज्या किरकोळ बाजारात विकल्या जात आहेत. गावठी भाज्यांच्या नावाखाली त्यांची विक्री सुरू आहे. जुईनगर, तुर्भे ते एरोली, तसेच इतर ठिकाणी रेल्वे रुळालगत नाल्यातील सांडपाण्यावर पिकविली जाणारी भाजी गवताच्या काड्यांनी बांधलेली असते.
ग्रामीण भागातून येणाऱ्या भाज्यांच्या तुलनेत या अधिक ताज्या वाटतात. या भाज्यांमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. मार्केटमध्ये रेल्वे रुळाच्या बाजूच्या दूषित पालेभाज्यांची आवक वाढली आहे. यात पालक, चवळी, भेंडी, लाल माठ, माठ आदींचा समावेश आहे. या पालेभाज्या पिकविण्यासाठी रेल्वे रुळांलगतच्या गटारातील सांडपाण्याचा वापर केला जातो. नवी मुंबईतील नाल्यांमध्ये विविध रासायनिक कंपन्यांचे आणि एमआयडीसी मधून सोडलेले सांडपाणी असते. त्यामुळे या भाज्या घातक आहेत. मात्र, या भाज्यांचे उत्पादन जोरात सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.