ठाणे - मागील काही दिवसांत राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱयांच्या बदल्या होत आहेत. यानंतर भाजपने संबंधित बदल्यावर आक्षेप घेतले. त्याला प्रत्युत्तर देताना, अशा प्रकारच्या बदल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच केल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या बदल्या करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी सरकारने केल्याचा दावा त्यांनी केलाय. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर भाजपाने सरकार अपयश लवण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना, 'पहिले बाहेर पडून कामं करावी, मग टीका करावी' असा सल्ला त्यांनी भाजपाला दिला आहे. ही वेळ राजकारणाची नसल्याचे ते म्हणाले.
आज ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदी विपिन शर्मा यांनी पदभार स्वीकारला असून ते स्वत: डाॅक्टर आहेत. त्यामुळे ठाण्यातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त केला. सध्या जिल्ह्यात उभारलेल्या क्वारंन्टाइन सेंटरमध्ये रुग्णांना योग्य सुविधा मिळत नसल्यास संबंधित यंत्रणेकडून त्याबाबत काळजी घेतली जाईल, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.